अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचवणे काळाची गरज - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचवणे काळाची गरज - बाळासाहेब थोरात 

◻️संगमनेरमध्ये ४० एकरावरील ‘कळस कृषी प्रदर्शना’त तंत्रज्ञानाचा महाकुंभ!


​संगमनेर LIVE | “कृषी क्षेत्र हे अफाट व्याप्ती असलेले क्षेत्र असून त्यात संशोधनाच्या आणि आर्थिक समृद्धीच्या प्रचंड संधी आहेत. कळस कृषी प्रदर्शनासारख्या उपक्रमांमुळे आधुनिक आणि अद्यावत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे,” असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या’ भव्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

​याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, कळस येथील युवकांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत जनजागृती व्हावी याकरता नऊ वर्षापूर्वी सुरू केलेला हा प्रयोग आज अत्यंत यशस्वी झाला आहे. आज कळस कृषी प्रदर्शन हे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून नावारूपास आले आहे. 

या प्रदर्शनासाठी मागील सहा महिन्यांपासून मोठे कष्ट घेण्यात आले असून, ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात पिकांचे प्रत्यक्ष प्लॉट आणि विविध तंत्रज्ञानावर आधारित काम सुरू आहे. अकोले व संगमनेर तालुका हे नेहमीच एक राहिले असून त्यांच्यातील बंधूभावाचे नाते या उपक्रमातून अधिक दृढ होत आहे. अमृतवाहिनी ही गुणवत्तेची ओळख असून, येथील कृषी महाविद्यालयातून भविष्यात कुशल तंत्रज्ञ निर्माण होतील आणि ते देश-विदेशात नाव कमावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​या प्रदर्शनाच्या ४० एकर परिसरामध्ये शैक्षणिक व कृषी औद्योगिक स्टॉल्ससह ६९ विविध पिकांच्या ३५० जातींची मांडणी करण्यात आली आहे. ५ एकर क्षेत्रावर झेंडू, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, गुलाब आणि कारले यांसारख्या पिकांचे जिवंत प्रात्यक्षिक प्लॉट हे शेतकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहेत. 

विशेष म्हणजे हॉलंड येथून आणलेले ‘ट्युलिप गार्डन’ हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असून, ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हे प्रदर्शन सर्व महिला आणि शालेय विद्यार्थ्यासाठी पूर्णपणे मोफत खुले ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि रणजीतसिंह देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पांडुरंग घुले, दुर्गाबाई तांबे, सागर वाकचौरे, शरयूताई देशमुख, डॉ. मैथिली तांबे, कैलास वाकचौरे आदि उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले आणि सागर वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !