नाशिक लॉग मार्चची यशस्वी सांगता; मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी!

संगमनेर Live
0
नाशिक लॉग मार्चची यशस्वी सांगता; मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी!

◻️ ​वनजमीन धारकांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक


​संगमनेर  LIVE | गेल्या काही दिवसांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या किसान सभेच्या 'नाशिक लॉग मार्च'ची अखेर यशस्वी सांगता झाली आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आंदोलकांनी हा लढा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​दिनांक २७ जानेवारी रोजी राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत किसान सभेच्या प्रतिनिधीमंडळाची सुमारे ३ तास मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, जलसंपदा मंत्री, वन मंत्री आणि शिक्षण मंत्री उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम चर्चेत, मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीची पूर्ण हमी सरकारने घेतली आहे.

​आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असलेल्या वनजमीन हक्कांबाबत सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे. या आश्वासनानुसार, आता राज्यभरातील वनजमीन धारक आपल्या जमिनीच्या दाव्यांच्या पुनर्तपासणीसाठी पुन्हा अर्ज करू शकणार आहेत. या प्राप्त अर्जाची रीतसर छाननी प्रांताधिकारी समितीमार्फत केली जाईल आणि संबंधित गाव समित्यांनी दिलेल्या अहवालाचा आधार घेऊन पात्र लाभार्थ्याना वन हक्क बहाल करण्याची पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​आंदोलनाच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच शहापूर तालुक्यातील खर्डी येथेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचा निर्णय या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. त्यानुसार २८ व २९ जानेवारी रोजी हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले अर्ज सादर केले. २९ जानेवारी रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आंदोलन स्थळी भेट देऊन हे सर्व अर्ज स्वीकारले आणि सरकारसोबत झालेल्या ऐतिहासिक चर्चेचे अधिकृत ‘मिनिट्स’ संघटनेच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले.

​शासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाचे सामूहिक नेतृत्व करणारे माजी आमदार जे. पी. गावीत यांनी या नाशिक लॉग मार्चची यशस्वी सांगता झाल्याची अधिकृत घोषणा केली. आंदोलनाच्या यशामुळे समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख यांसह हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !