महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा लवकरचं
◻️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सौ. नीलम खताळ यांनी केले अभिवादन
संगमनेर LIVE | शहरातील माळी समाज बांधवांची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा संगमनेर शहरात उभारण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात आवाज उठवला असून, आवश्यक निधी प्राप्त होताच या कामाला गती दिली जाईल, अशी ग्वाही सौ. नीलम खताळ यांनी दिली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. नीलम खताळ व शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सौ. खताळ पुढे म्हणाल्या की, “आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी शिक्षणाचा पाया रोवला म्हणूनच स्त्रिया आज स्वावलंबी झाल्या आहेत. या थोर दांपत्याचे स्मारक संगमनेर शहरात व्हावे, ही माळी समाजाची मागणी रास्त असून आमदार अमोल खताळ ती लवकरच पूर्ण करतील.”
माळी समाज पंच ट्रस्टचे सचिव अभिजीत (मुन्ना) पुंड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “शहरातील माळीवाडा परिसरात हा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत गेल्या वर्षीच आमदार खताळ यांना निवेदन देण्यात आले होते. हा प्रश्न मार्गी लावून लवकरात लवकर पुतळ्याचे काम सुरू व्हावे, हीच संपूर्ण समाजाची इच्छा आहे.” असे सांगितले.
दरम्यान याप्रसंगी शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, योगेश सूर्यवंशी, संपत गलांडे, वरद बागुल, अजित जाधव, समीर ओझा, विकास पुंड, शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, संगीता पुंड, सपना जाधव, माळी समाज पंच ट्रस्ट उपाध्यक्ष भारत ढोले, सचिव अभिजीत उर्फ मुन्ना पुंड, विश्वस्त किशोर ढोले, राजू माताडे, बाळासाहेब अभंग यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.