“कुठे चाललाय महाराष्ट्र?” बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली चिंता

संगमनेर Live
0
“कुठे चाललाय महाराष्ट्र?” बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली चिंता

◻️ ऑडिट आणि बॅलन्स शीट वेबसाईटवर येणार - आमदार सत्यजीत तांबे

◻️ संगमनेर नगरपरिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकार सोहळा संपन्न


​संगमनेर LIVE | “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीत मतमतांतरे आणि पक्षीय लोकशाही अभिप्रेत आहे. मात्र, सध्या राज्यातील राजकारणाचे जे विदारक चित्र समोर येत आहे, ते चिंताजनक आहे. तिकिटांसाठी होणारा गोंधळ, निष्ठावंतांवर होणारा अन्याय आणि सत्तेसाठी चाललेली जीवघेणी स्पर्धा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा शब्दांत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदभार ग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते.

​यावेळी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजकारण हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करायचे असते, केवळ सत्तेसाठी नाही. सध्या राज्यात बाहेरच्यांना मिळणारी संधी आणि निष्ठावंतांची होणारी गळचेपी यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्राच्या भविष्यासाठी घातक असून, आपल्याला संगमनेरची ‘सुसंस्कृत राजकारणाची’ परंपरा अधिक ताकदीने जपायची आहे. संगमनेरमध्ये स्वच्छता, बंधुभाव आणि एकात्मता ही आपली खरी संस्कृती असून आपण कोणाचाही द्वेष करत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

​संगमनेरच्या विकासाच्या वारशाबद्दल बोलताना थोरात यांनी सांगितले की, १९९१ पासून डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने विकासाचे एक आदर्श मॉडेल उभे केले आहे. शहरात अनेक मोठी कामे मार्गी लागली असून 'हॅपी हायवे' सारख्या प्रकल्पांनी शहर चकाकले आहे. मात्र, सुंदर बस स्थानकाच्या विद्रुपीकरणाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्हाला ओळखा" असे सांगणाऱ्यांनी केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी फ्लेक्स लावून शहराचे सौंदर्य खराब केले आहे. संगमनेरच्या जनतेने जो मोठा विश्वास आपल्यावर टाकला आहे, त्याला पात्र ठरून नूतन पदाधिकाऱ्यांनी शहराच्या आनंदासाठी आणि सुखासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

​आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी नगरपालिकेच्या कामकाजात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ते म्हणाले की, “संगमनेर शहराला पुढे नेण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यापुढील काळात नगरपालिकेचे ऑडिट आणि बॅलेन्स शीट थेट वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. इतकेच नाही तर प्रत्येक नगरसेवकाच्या कामाचे मूल्यमापन करून त्याचे ‘रिपोर्ट कार्ड’ नागरिकांच्या घरापर्यत पोहोचवले जाणार आहे. शहराला विकासासाठी मिळणारा निधी आणि होणारा खर्च याचा ताळेबंद जनतेसमोर मांडला जाईल. तसेच, शहरातील बेशिस्त आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाला काही कठोर व कटू निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

​कार्यक्रमाच्या शेवटी संगमनेरच्या 'ट्रेण्ड'बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, संगमनेर सेवा समितीने सुरू केलेले स्वच्छता अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. संगमनेरचा प्रत्येक उपक्रम हा राज्यासाठी आदर्श असतो आणि हीच परंपरा पुढे चालू ठेवत राज्यातील सर्वोत्तम नगरपालिका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी राजेश मालपाणी यांनी डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहराची प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, जर्मनीच्या खासदार क्लोडिया नॉलटे, सरोजना पगडाल, प्राची शहा, सौ. दुर्गाताई तांबे, राजेश मालपाणी, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह नुतन पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले तर प्रमिला अभंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !