साईच्या झोळीत २३ कोटींचे दान आणि हिरेजडीत मुकुट अर्पण

संगमनेर Live
0
साईच्या झोळीत २३ कोटींचे दान आणि हिरेजडीत मुकुट अर्पण

◻️ शिर्डीत भक्तीचा महापूर! नाताळ आणि नवीन वर्षात ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन


संगमनेर LIVE (​शिर्डी) | ​नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या निमित्ताने शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात भाविकांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ या नऊ दिवसांच्या कालावधीत आयोजित ‘शिर्डी महोत्सवात’ सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या भक्तीच्या उत्सवादरम्यान संस्थानला विविध माध्यमांतून सुमारे २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये इतके विक्रमी दान प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

​या महोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केले. यामध्ये दानपेटीतून ६ कोटी २ लाख ६१ हजार ६ रुपये, तर देणगी काउंटरद्वारे ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये जमा झाले आहेत. यासोबतच पीआरओ सशुल्क पासांच्या माध्यमातून २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डरद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपयांची भर पडली असून, २६ विविध देशांतील परकीय चलनाच्या माध्यमातून १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये इतकी रोख देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.

​सुवर्ण आणि रौप्य दानाबाबत माहिती देताना गाडीलकर यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने बाबांच्या चरणी सुमारे ८० लाख रुपये किमतीचा सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. या आकर्षक मुकुटाचे एकूण वजन ६५५ ग्रॅम असून, त्यात ५८५ ग्रॅम शुद्ध सोने आणि १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे जडवलेले आहेत. याव्यतिरिक्त महोत्सवाच्या काळात ३६ लाख ३८ हजार रुपये किमतीचे २९३ ग्रॅम सोने आणि ९ लाख ४९ हजार रुपये किमतीची सुमारे ६ किलो चांदी देणगी स्वरूपात मिळाली आहे. अशा प्रकारे रोख आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात संस्थानच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.

​भक्तांच्या भोजन आणि प्रसादासाठी संस्थानने चोख व्यवस्था केली होती. या नऊ दिवसांत ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईप्रसादालयात मोफत भोजन घेतले, तर १ लाख ९ हजार भाविकांनी अन्न पाकीटांचा लाभ घेतला. लाडू प्रसादाच्या ७ लाख ६७ हजार पाकीटांच्या विक्रीतून २ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ५ लाख ७६ हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान या सर्व दानाचा विनियोग साईबाबा हॉस्पिटल, साईनाथ रुग्णालय, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्था आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी पारदर्शकपणे केला जाणार असल्याचेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !