शाश्‍वत विकासासाठी युवकांनी ‘जल-जमीन’ संवर्धनाचे दूत बनावे - प्रा. गणेश भामे

संगमनेर Live
0

शाश्‍वत विकासासाठी युवकांनी ‘जल-जमीन’ संवर्धनाचे दूत बनावे - प्रा. गणेश भामे

◻️ ​पिंप्री - लौकी अजमपुर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन 


संगमनेर LIVE (आश्‍वी) | युवकांनी शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास व पडीक जमिनीच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घ्यावा. समाजाच्या सर्वागीण विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन प्रा. गणेश भामे यांनी केले.

​सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आश्‍वी खुर्द येथील प्रवरेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’ या विषयावर आधारित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन पिंप्री - लौकी अजमपुर येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले आणि प्रा. गणेश भामे यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी प्राचार्य देविदास दाभाडे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी गावच्या विकासासाठी विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांमार्फत संपूर्ण गाव आणि परिसराची स्वच्छता केली जाणार असून, जल व मृद संवर्धनांतर्गत पाण्याचे योग्य नियोजन आणि मातीची धूप थांबवण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले जाणार आहे. 

पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येईल, तसेच गावातील पडीक जमिनीला पुन्हा उपजाऊ बनवून तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष तांत्रिक व कष्टाची कामे स्वयंसेवक पूर्ण करणार आहेत. या उपक्रमांमुळे युवकांमध्ये केवळ पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार नाही, तर त्यांच्यातील सामाजिक जबाबदारीचे भानही वृद्धिंगत होईल,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​यावेळी प्रा. डॉ. सुनील मोहटे यांनी विद्यार्थ्याना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून दिले. सात दिवसांच्या या संपूर्ण शिबिराचे सविस्तर नियोजन आणि रूपरेषा डॉ. आदिनाथ घोलप यांनी उपस्थितांसमोर मांडली.

दरम्यान ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता तळेकर व प्रा. अमित शिंदे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रय लोखंडे यांनी मानले. तर, या उद्घाटन सोहळ्याला, शिक्षक, विद्यार्थ्यासह पिंप्री - लौकी अजमपुर गावचे प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !