संगमनेरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; देशी दारूची वाहतूक करणारी कार जप्त
◻️ २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत दोन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाला संगमनेर परिसरात गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती मिळाली होती. संगमनेरहून देवगडच्या दिशेने एका चारचाकी कारमधून बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी प्रवरा नदीपात्रावरील पुलाजवळ पहाटेच सापळा रचला.
संशयास्पद वाटणारी हुंदाई कार पोलिसांनी अडवली. कारची झडती घेतली असता डिकीमध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, १९ हजार ५२० रुपये किंमतीची देशी दारू, २ लाख रुपये किंमतीची हुंदाई कार असा एकूण २ लाख १९ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, ही दारु अकोले नाका येथून आणल्याची माहिती मिळाली. पोलीस आता या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.