महामानवाच्या प्रतिमेचा शिबलापूर ग्रामपंचायतीत अवमान?
◻️‘वचित’चे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकराकडून घटनेची दखल
◻️ दोषींवर कारवाई न झाल्यास स्थानिकांकडून आमरण उपोषणाचा इशारा
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील एका अडगळीच्या खोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवून त्यांचा अनादर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी केला आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १२ जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
संजय मुन्तोडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ६ डिसेंबर (महापरिनिर्वाण दिन) पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ग्रामपंचायतीच्या एका जुन्या अडगळीतल्या खोलीत ठेवण्यात आला आहे. लोकशाहीच्या मंदिरातच महामानवाचा असा अपमान झाल्याने आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वीही यासंदर्भात लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे मुन्तोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
हा प्रकार केवळ प्रतिमेचा अवमान नसून भारतीय संविधानाचे अवमूल्यन करणारा आणि सामाजिक शांतता बिघडवणारा आहे, असा गंभीर आरोप मुन्तोडे यांनी केला असून “जोपर्यत दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही आणि बाबासाहेबांचा फोटो सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी लावला जात नाही, तोपर्यत मी हटणार नाही. येत्या सोमवार, १२ जानेवारी रोजी शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर माझे आमरण उपोषण सुरू होईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी हे निवेदन स्वीकारले असून, पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शिबलापूर येथील घटनेची माहिती संजय मुन्तोडे यांनी ‘वंचित बहुजन आघाडी'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना फोनवरून दिली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः प्रकाश आंबेडकर हे या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे समजते.
शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील महामानवाचे जीर्ण झालेले फोटो काढून त्याठिकाणी नवीन फोटो लावण्यात आले आहेत. काढलेले जीर्ण फोटो हे स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महामानवाचा अवमान झालेला नाही. मात्र, त्याचं काढून ठेवलेल्या फोटोचा फोटो हा समाजमाध्यमामध्ये वायर झाल्यामुळे कोणाचाही यातून गैरसमज झाला असल्यास तो गैरसमज दूर करु. असे शिबलापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलिप मुन्तोडे यांनी सांगितले.