पैशाने नव्हे, तर समाधानानेच जीवन होईल ‘सुंदर’ - गणेश शिंदे
◻️ २५ व्या पद्मश्री डॉ. विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
संगमनेर LIVE (लोणी) | “बौद्धिक साधनांच्या जोरावर नाही, तर निसर्गासोबत राहूनच जीवन सुंदर होणार आहे. संकटाचा धैर्याने सामना करा आणि छोट्या गोष्टींतून आनंद शोधायला शिका,” असा मोलाचा संदेश प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिला.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित २५ व्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर त्यांनी विविध संदर्भांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्रोत्यांचे प्रबोधन करताना गणेश शिंदे म्हणाले की, जीवन जगताना स्वतः यंत्र न होता माणूस म्हणून सर्वाना बरोबर घेऊन जगले पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे आणि छोट्या गोष्टीत दडलेला आनंद शोधला पाहिजे. आपल्या अंगी असलेले कौशल्य, नातीगोती आणि त्यांतील प्रेम जपा. परिवर्तनाचा ध्यास घेताना कुणाचे अनुकरण करण्यापेक्षा समाधानी राहायला शिका.
पैसा जीवन सुंदर करू शकत नाही आणि पैशाचा आनंद टिकणाराही नसतो, त्यामुळे आपल्या अंतरमनाचा अंदाज घेऊनच वाटचाल व्हायला हवी. साधुसंतांचे विचार समजून घेताना संकटांना आनंदी वृत्तीने सामोरे जा आणि आपल्या जगण्याचे स्वतःच कौतुक करा. कलेच्या माध्यमातून आपण समृद्ध होऊ शकतो, त्यामुळे कोणतीही कला जोपासा आणि आपल्या आनंदाची संकल्पना बदला, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवरेच्या या पवित्र भूमीमध्ये विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेऊन आपली प्रगती साधा आणि इतरांनाही सोबत घेऊन पुढे जा, असा संदेश त्यांनी दिला. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप “काय सांगू राणी तुला, मला गाव सुटाना” या गीताने करून श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील होत्या. यावेळी बोलताना त्यांनी व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षात सकारात्मक विचारांचा जागर व्हावा, हीच अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, माजी चेअरमन कैलास तांबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्य डॉ. आर. ए. पवार आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेचा उद्देश सांगताना २५ वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला. समाजात विचारांचे आदान-प्रदान व्हावे आणि आदर्श समाज निर्माण व्हावा, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी मानले.
दरम्यान व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प येत्या शनिवारी, १७ जानेवारी २०२५ रोजी गुंफले जाणार असून, पुणे येथील उद्योजक शरद तांदळे ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.