कळस कृषी प्रदर्शनात पंजाबसह देशभरातील २५० संकरीत गाईची मांदियाळी!
◻️ आधुनिक तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायात क्रांती शक्य - रणजीतसिंह देशमुख
◻️ ५५ लिटर दूध देणाऱ्या ‘गाई’ला पाहण्यासाठी संगमनेर येथे शेतकऱ्याची गर्दी
संगमनेर LIVE | शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शन’ सध्या संगमनेरमध्ये मोठे आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनातील सौंदर्य व दुग्ध स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायात क्रांती शक्य होईल. असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सौ. शरयूताई देशमुख, प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, गोरख नवले, विलासराव वर्पे, विष्णू ढोले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिल्लारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी. बी. बाचकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रणजीतसिंह देशमुख पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा ‘दुधाचा तालुका’ म्हणून ओळखला जातो. दुग्ध व्यवसायामुळे अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण झाले असून, या व्यवसायात कमी श्रमात जास्त दूध उत्पादन होण्याकरिता अशा कृषी व डेअरी प्रदर्शनांची अत्यंत गरज आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे नक्कीच मार्गदर्शन मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील तीन दिवस खुले राहणार असून, तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या डेअरी प्रदर्शनातील दुग्ध व सौंदर्य स्पर्धेमध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळाली. जर्सी गाईच्या २ ते ४ वयोगटातील स्पर्धेत पारनेर येथील अविनाश शिंदे यांच्या गाईने प्रथम क्रमांक पटकावला, तर कळस येथील अशोक वाकचौरे यांच्या गाईला द्वितीय आणि वडगाव लांडगा येथील हरीश लांडगे यांच्या गाईला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच होल्स्टेन (HF) गाईच्या गटामध्ये जोर्वे येथील प्रतीक थोरात यांच्या गाईने प्रथम, वैजापूर येथील प्रशांत चव्हाण यांच्या गाईने द्वितीय आणि सिन्नर येथील सुभाष आव्हाड यांच्या गाईने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
५५ लिटर दुधाची क्षमता असलेल्या गाईसह प्रदर्शनातील अत्यंत सुंदर अशा कालवडी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
याच कार्यक्रमादरम्यान माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी 'व्हिजनरी ॲग्रीकल्चर २०५०' व 'स्पर्धा परीक्षा' या विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही उपस्थित राहून प्रदर्शनाची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित खिल्लारी यांनी केले, सूत्रसंचालन जी. बी. बाचकर यांनी केले, तर सागर वाकचौरे यांनी आभार मानले. या सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या गाईच्या मालकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.