११ व्या सद्भावना सायकल यात्रेचा समारोप १२ जानेवारीला
◻️ स्नेहालयातर्फे मान्यवरांचा गौरव व पुरस्कार वितरण सोहळा
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | समाजातील वाढता द्वेष, अविश्वास आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर “हिंसा–द्वेष सोडूया, माणूस माणूस जोडूया” हा उदात्त संदेश देणाऱ्या ११ व्या सद्भावना सायकल यात्रेचा समारोप येत्या सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
स्नेहालय संस्थेच्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित या सोहळ्यात प्राणिमित्र विलासभाई शहा प्रायोजित विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, पद्मश्री पोपटराव पवार व विलासभाई शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
गेल्या १४ दिवसांत ६० सायकल यात्रेकरूंनी सुमारे ८०० किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान यात्रेने ३५ विविध ठिकाणी समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधला. रोटरी क्लब, लायन्स क्लब, युवक मंडळे, महिला गट तसेच सामाजिक सलोख्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी संवाद साधत या यात्रेकरूंनी भारतीय संविधानावर आधारित राष्ट्रधर्म, मानवता आणि सामाजिक ऐक्याची जाणीव निर्माण केली.
या उपक्रमाद्वारे प्रामुख्याने स्त्री व बालहक्कांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन, मानसिक आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि अनैतिक मानवी वाहतूक यांसारख्या गंभीर सामाजिक विषयांवर व्यापक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ गांधीवादी विलासभाई शहा यांच्या सौजन्याने दिला जाणारा पुरस्कार वितरण सोहळा. यामध्ये ओडिशा राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी दीर्घकाळ कार्य करणाऱ्या आदर्श दांपत्याला 'कर्मयोगीनी साधना ताई' आणि 'महामानव बाबा आमटे सेवाव्रती पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासोबतच भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष उद्योजक केतन शहा, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मधुकर अनाप आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित असलेले सेवानिवृत्त शिक्षक वामन बावळे यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित केले जाईल.
दरम्यान हा सोहळा सर्वांसाठी खुला असून सामाजिक परिवर्तन आणि सलोख्याचा हा प्रवास अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्नेहालय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.