१३ वर्षीय मुलीचे अपहरण करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात!
◻️ एलसीबीने झरेकाठी - देवगाव रस्त्यावर सापळा रचून केली कारवाई
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कुरण येथून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिताफीने ताब्यात घेतले आहे. या धाडसी कारवाईत पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून, आरोपीकडून चोरीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
कुरण येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला कलीम पठाण (रा. संगमनेर) याने अमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास करून आरोपीला जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे तपास करत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी कलीम पठाण हा एका विना नंबरच्या बजाज प्लॅटिना मोटारसायकलवरून पीडित मुलीसह झरेकाठी येथून देवगाव मार्गे संगमनेरला येणार असल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पथकाने देवगाव रोडवरील सिध्दकला हॉस्पिटलजवळ सापळा लावला. संशयित मोटारसायकल येताच पोलिसांनी शिताफीने तिला अडवून आरोपी कलीम पठाण (वय २२) याला ताब्यात घेतले आणि महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने पीडित मुलीची सुटका केली.
पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या विना नंबरच्या मोटारसायकलबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने ही दुचाकी आपला साथीदार जुनेद शेख (रा. समनापूर) याच्या मदतीने झोळे येथून चोरल्याची कबुली दिली. तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपी कलीम पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, शिर्डी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे केवळ अपहरणाचा गुन्हाच नव्हे, तर दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचाही देखील उलगडा झाला आहे.
दरम्यान ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली. तर, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी, मुद्देमाल आणि अल्पवयीन मुलगी यांना पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.