शहागड आणि महाकाय वटवृक्ष हे वैभव जतन करा - बाळासाहेब थोरात
◻️ पेमगिरी येथे ३ कोटी २८ लाखांच्या विकास कामांचे लोकार्पण
संगमनेर LIVE | स्वराज्य संकल्पकाची भूमी असलेल्या ऐतिहासिक पेमगिरी गावाचा विकास हे आपले ध्येय असून, या भागातील शहागडासह विविध ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. पेमगिरी हे एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आले असून, आता निळवंडे कालव्याच्या वरील भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आपला लढा सुरू राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे ३ कोटी २८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेमगिरीचा ऐतिहासिक शहागड आणि येथील जगप्रसिद्ध महाकाय वटवृक्ष हे राज्याचे वैभव असून या स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व संरक्षणासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. मोरदरा धरण ते गाव अंतर्गत रस्ते आणि इतर नागरी सुविधांमुळे आज गावचे रूप पूर्णपणे पालटले आहे.
निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम आपण पूर्णत्वास नेले असले तरी, कालव्याच्या वरच्या बाजूला असलेल्या क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे; त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण शिक्षणाचा कणा असून मी शिक्षण मंत्री असताना ‘शिक्षणाचा अधिकार’ देऊन मोठी क्रांती केली होती, मात्र सध्याचे सरकार अनेक शाळा बंद करण्याच्या विचारात असून त्यांचे धोरण उदासीन आहे.
पेमगिरीतील महिला बचत गटांचे कार्य कौतुकास्पद असून काॅग्रेसने नेहमीच महिलांना आरक्षण आणि सन्मान देऊन त्यांच्या प्रगतीसाठी काम केले आहे. गेल्या ४० वर्षात जनतेच्या खंबीर साथीमुळेच संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य ठरला असून, सध्याचे सरकार केवळ घोषणा करत असून प्रत्यक्षात त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.