रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाच्या कामात स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घ्या!

संगमनेर Live
0
रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाच्या कामात स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घ्या!

◻️ आमदार अमोल खताळ यांचे महामार्ग प्राधिकरणाला स्पष्ट निर्देश


​संगमनेर LIVE | पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि कामाचा दर्जा व सुरक्षिततेबाबत कडक सूचना दिल्या.

​पाहणी दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार खताळ यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या ठिकाणी नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी लहान भुयारी मार्ग (अंडरपास) असावा, पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेले सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) दर्जेदार आणि मजबूत असावेत, तसेच महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी परावर्तक, पथदिवे, हायमास्ट दिवे आणि दिशादर्शक फलक बसवावेत, अशा मागण्यांचा समावेश होता.

याशिवाय, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था करावी आणि महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेल्या हक्काच्या मार्गाचे अचूक मोजमाप करूनच पुढील काम करण्यात यावे, असेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

​या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. विकासकामे करताना स्थानिक नागरिकांचा विचार करणे प्राथमिक कर्तव्य असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि दैनंदिन जीवनाला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिकांना विश्‍वासात घेऊन आणि त्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढूनच उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे,” असे निर्देश दिले.

दरम्यान ​या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे निलेश गुंजाळ, माजी सरपंच ॲड. भाऊसाहेब गुंजाळ, अक्षय खुळे, सचिन पावबाके, महेश मांडेकर, संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश सातपुते, दत्तात्रय खुळे, अमोल खुळे, किशोर खुळे, विजय खुळे, राजू खुळे, चांगदेव खुळे, विशाल ढोमसे, संकेत खुळे, अभिषेक गुंजाळ, योगेश खुळे, अविनाश मांडेकर, वैभव खुळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !