◻️११ लाखांच्या मुद्देमाल ताब्यात; ११ आरोपींवर गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली असून, याच मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास संगमनेरमधील मोगलपुरा भागात छापा टाकला. राजवाडा परिसरातील बुद्धविहारासमोर अतिक कुरेशी आणि सलीम कुरेशी हे गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, काही लोक कत्तल केलेले मांस टेम्पोमध्ये भरताना रंगेहाथ आढळले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून फैज कुरेशी, सद्दम कुरेशी, कलिम सय्यद, मुलमफरिद कुरेशी, अनस कुरेशी, फैसल कुरेशी आणि जुनेद कुरेशी या सात जणांना जागीच ताब्यात घेतले.
या कारवाई दरम्यान अतिक कुरेशी, सलीम कुरेशी, हाशमी कुरेशी आणि टेम्पो मालक हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे तब्बल १८०० किलो गोमांस, ५ लाख ५० हजार रुपयांचा टाटा टेम्पो, १२ हजार रुपयांची एक रिक्षा, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी कुऱ्हाड, चाकू व काणस असा एकूण ११ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दिपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत आढाव, चालक महादेव भांड यांचे पथकाने पार पाडली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.