मनोली येथून चोरट्यांनी ६५ हजारांचा मुद्देमाल केला लंपास
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मनोली परिसरात घरफोडीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी कडी-कोडा तोडून स्वयंपाक घरात प्रवेश करत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोली येथील रहिवासी विश्राम शिंदे यांच्या घरात ही चोरीची घटना घडली. रविवार, ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिंदे यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीचा कडी-कोडा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाची उचकापाचक करून त्यातील दीड तोळ्यांची सोन्याची पोत, २.५ ग्रॅमचे कानातील दागिने आणि १५ हजार रुपये रोख असा अंदाजे ६५ हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार शिंदे यांच्या लक्षात आला.
त्यानंतर विश्राम शिंदे यांनी तातडीने आश्वी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गु.रं.न. १६/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५(ए), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राम लहामगे करत आहेत.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीसाशी संपर्क साधावा. असे आवाहन आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी केले आहे.