उद्या गुरुवारी ‘ग्रामीण भारत बंद’ आणि औद्योगिक संपाची हाक - डॉ. अजित नवले
संगमनेर LIVE | केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरोधात आणि श्रमिक जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी उद्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशात ऐतिहासिक ‘अखिल भारतीय औद्योगिक संप’ आणि ‘ग्रामीण भारत बंद’ पाळला जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटना आणि ५०० हून अधिक शेतकरी संघटनांचा सहभाग असलेल्या ‘संयुक्त किसान मोर्चा’ने या आंदोलनाची हाक दिली असून, या माध्यमातून सरकारला इशारा दिला जाणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, कामगारांनी दीर्घ संघर्षातून मिळवलेले २९ कामगार कायदे उध्वस्त करून सरकारने चार नव्या श्रम संहिता लादल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे देशाची स्वायत्तता धोक्यात आली असून, भारतीय शेती, शेतकरी आणि स्थानिक उद्योग उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. वीज दुरुस्ती बिलाच्या नावाखाली विजेचे खासगीकरण आणि स्मार्ट मीटर योजना आणून शहरी व ग्रामीण ग्राहकांवर वाढीव बिलांचा प्रचंड बोजा लादला जात असून, बियाणे बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनवण्याची रणनीती केंद्र सरकार राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील रोजगाराच्या संदर्भात चिंता व्यक्त करताना डॉ. नवले म्हणाले की, शेतमजुरांच्या संघर्षातून अस्तित्वात आलेला ‘मनरेगा’ हा हक्काचा रोजगार हमी कायदा रद्द करून सरकारने ‘ग्राम-जी’ हा नवा कायदा मंजूर केला आहे. यामुळे मागणी आधारित कामाऐवजी निधी आधारित काम देऊन ग्रामीण जनतेचा रोजगाराचा हक्क कमकुवत केला गेला आहे.
या सर्व अन्यायकारक निर्णयांचा निषेध करण्यासाठी आणि श्रम संहिता रद्द करणे, वीज दुरुस्ती बिल मागे घेणे तसेच योजना कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा मिळवून देणे या मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील सर्व कामगार, कर्मचारी आणि शेतमजुरांनी या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.