संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने ५ दिवसांत जमीनदोस्त होणार!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचे संकेत
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांच्या विरोधात आता प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व २८ बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्याचे कडक आदेश त्यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरात सध्या सुमारे २८ ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर केवळ वरवरची कारवाई न करता, संबंधित आरोपींवर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. या कारवाईच्या नियोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कत्तलखाने उध्वस्त करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ते आमदार झाल्यापासून या बेकायदेशीर प्रकारांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत आणि अधिवेशनातही हा प्रश्न मांडणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी अनेकदा कारवाई होऊनही काही काळाने हे कत्तलखाने पुन्हा सुरू होतात, मात्र आता केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. शहरातील नागरिकांचे आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.
या अवैध कत्तलखान्यांमुळे परिसरात पसरणारी दुर्गधी, आरोग्याच्या वाढत्या तक्रारी आणि पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, शहरावर लागलेला हा ‘बेकायदेशीरपणाचा कलंक’ पुसून काढण्याचा ठाम निर्धार आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक रहिवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे हेच प्रशासनाचे ध्येय असून, येत्या आठवड्यात संगमनेरमध्ये ही मोठी निर्णायक कारवाई पूर्ण झालेली पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.