“वारकरी संप्रदायच मानवतेचा खरा आधार” - बाळासाहेब थोरात
◻️ गुंजाळवाडीत स्वागत कमान आणि डिजिटल फलकाचे अनावरण
संगमनेर LIVE | “विविध संत आणि समाज सुधारकांनी नेहमीच मानवतेचा धर्म सांगितला आहे. वारकरी संप्रदायाचा खरा पाया हा मानवता धर्मच असून, समतेचा विचार सांगणारी ही परंपरा अत्यंत समृद्ध आहे. प्रत्येकाच्या जीवनात या संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील गुंजाळवाडी (वेल्हाळे शिव) येथील श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थानच्या वतीने लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील ‘आय लव काशी विश्वेश्वर' या डिजिटल फलकाचेही अनावरण केले.
महाराष्ट्राला लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, विविध जाती-धर्मातील अनेक संतांनी या संप्रदायाच्या माध्यमातून समता आणि मानवतेचा दिलेला मंत्र आपण सर्वानी पायिक म्हणून जपला आहे. संगमनेर तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी निझर्णेश्वर, खांडेश्वर, बाळेश्वर आणि दुधेश्वर यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे.
याच साखळीत काशी विश्वेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी दिलेल्या निधीमुळे हा परिसर आता अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य झाला आहे. सर्वांच्या एकजुटीतून आणि लोकसहभागातून उभारलेली ही आकर्षक स्वागत कमान खऱ्या अर्थाने गावाच्या वैभवात भर टाकणारी ठरली आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या परिसरात येणारे असंख्य शिवभक्त आणि येथे आयोजित होणाऱ्या हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकवर्गणीतून झालेली ही विकासकामे समाजहित आणि धार्मिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरली आहेत. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सुशोभीकरण आणि नवीन डिजिटल आकर्षणामुळे काशी विश्वेश्वर मंदिर आता केवळ धार्मिक केंद्र न राहता पर्यटनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे स्थळ म्हणून नावारूपास येण्यास मदत होणार आहे.