जोर्वेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ जोर्वे येथील “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमात महिलांचा जनसागर उसळला
◻️ उंबरी बाळापूर, रहिमपूर, जोर्वे गावातील महिलांकडून बक्षिसांची लयलूट
संगमनेर LIVE | जोर्वे येथील ग्रामस्थांनी विखे पाटील परिवारावर जो विश्वास आणि प्रेम दाखवले आहे, त्याची परतफेड गावाच्या सर्वागीण विकासातून केली जाईल. जोर्वेच्या प्रगतीसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, ही माझी वैयक्तिक जबाबदारी असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
भाजपचे आश्वी मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे व सरपंच प्रिती दिघे यांच्या संकल्पनेतून जोर्वे येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात आयोजित “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमात महिला भगिनींशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी जोर्वेच्या ग्रामस्थांना विकासाचा आणि सुरक्षेचा शब्द दिला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जोर्वे गावाचा आजवर सर्वागीण विकास झाला आहे. मतदारसंघातील प्रत्येक महिला सुरक्षित राहावी, ही आमची प्राथमिकता असून त्यासाठी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा जो पुढाकार युवकांनी घेतला आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. “तुम्ही जागा द्या, स्मारक मी उभारतो” हा जोर्वे ग्रामस्थांना दिलेला शब्द आता पूर्णत्वास जात असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. भविष्यातही विखे पाटील परिवाराच्या पाठीशी अशाच प्रकारे ठामपणे उभे राहावे, आम्ही आमची संपूर्ण ताकद तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लावणार आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या “खेळ पैठणीचा” स्पर्धेत महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेत उंबरी बाळापूरच्या सोनाली सारबंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्कुटी दुचाकी जिंकली, तर पुष्पा खेमनर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत फ्रिज मिळवला. तृतीय क्रमांकाच्या मानकरी रहिमपूरच्या सोनाली शिंदे (एलईडी टीव्ही), चतुर्थ क्रमांक जोर्वेच्या सुनिता मोरे (दळणाची गिरणी), पंचम क्रमांक जोर्वेच्या मनीषा इंगळे (शिलाई मशीन) आणि सहावा क्रमांक उंबरी बाळापूरच्या मीनाक्षी भुसाळ (सायकल) यांनी पटकावला. याव्यतिरिक्त मिक्सर, पाणी जार आणि पैठणी अशी विविध आकर्षक बक्षिसे जिंकत सर्व महिला भगिनींनी या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी सौ. नीलम खताळ, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, रहिमपूरच्या सरपंच सविता शिंदे, कनकापूरच्या सरपंच ज्योती पचपिंड, मालुंजेच्या सरपंच सुवर्णा घुगे यांसह जिल्हा परिषद गटातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गोकुळ दिघे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनिषा वर्पे यांनी केले.