केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सीटू आणि किसान सभेचा एल्गार!
◻️ देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात कामगार व शेतकऱ्यांची लाल बावटे हाती घेऊन रॅली
संगमनेर LIVE (अकोले) | अमेरिका-भारत करार, कामगारांचे कंबरडे मोडणाऱ्या चार श्रम संहिता आणि रोजगार हमी कायद्यात करण्यात आलेले मजूर विरोधी बदल यांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औद्योगिक आणि ग्रामीण भारत बंदला अकोले तालुक्यात उत्स्फूर्त आणि आक्रमक प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारच्या या धोरणांच्या विरोधात 'सीटू' कामगार संघटना आणि 'किसान सभे'च्या वतीने अकोले शहरात हजारो कामगार व शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढत तीव्र निदर्शने केली. लाल बावटे हाती घेऊन निघालेल्या या विराट मोर्चामुळे संपूर्ण अकोले शहर दुमदुमून गेले होते.
केंद्र सरकारने वर्षानुवर्षे लढे देऊन मिळविलेले कामगारांचे अधिकार एका झटक्यात खारीज करत चार नव्या कामगार संहिता लागू केल्या आहेत, ज्या संपूर्णपणे कामगार विरोधी आहेत. तसेच, नुकत्याच झालेल्या अमेरिका-भारत टेरिफ कराराच्या माध्यमातून देशाचे संपूर्ण कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्यात आले आहे. या करारांतर्गत भारताचा ३ टक्क्यांवर असलेला टेरिफ १८ टक्के करण्यात आला असून, अमेरिकेसाठी मात्र तो शून्य करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, या कराराच्या दबावाखाली भारताला रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त कच्च्या तेलावर बंदी घालण्यात आली असून, अमेरिकेकडून महागडे व निकृष्ट दर्जाचे तेल घेण्यास भारताला भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ’रोजगार हमी कायद्या’तही (मनरेगा) केंद्र सरकारने अत्यंत घातक बदल केले आहेत. हा कायदा आता ‘मागणी आधारित’ न ठेवता ‘निधी आधारित’ आणि पूर्णपणे सरकारच्या मर्जीवर अवलंबून ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगार उपलब्धतेवर अत्यंत विपरीत परिणाम होणार असल्याची भीती मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
एकीकडे देश कॉर्पोरेट कंपन्या आणि अमेरिकेच्या दावणीला बांधला जात असताना, देशाला उभे करणारे कामगार, कर्मचारी आणि शेतकरी मात्र देशोधडीला लावले जात आहेत. आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ परिचर, बांधकाम कामगार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अनेक रास्त मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. अनेकदा मोठे मोर्चे काढूनही सरकार केवळ आश्वासने देत असून त्याची कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
या सर्व अन्यायकारक धोरणांविरोधात देशभरात संतापाची लाट असून, त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कामगार आणि शेतकरी एकवटले. येथून अकोले शहरातून हजारोच्या संख्येने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. “केंद्र सरकारचा धिक्कार असो”, “कामगार एकजूट झिंदाबाद” अशा जोरदार घोषणांनी शहर दणाणून सोडले. ही रॅली अकोले तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर त्याचे रूपांतर एका मोठ्या सभेत झाले. यावेळी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली.
दरम्यान या भव्य आणि आक्रमक मोर्चाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, रंजना पराड, निर्मला मांगे, संगीता साळवे, हेमलता शेळके आणि भीमा मुठे आदी मान्यवरांनी केले.