बाळासाहेब थोरात हे तालुक्यांच्या सर्वागीण विकासाचे ‘आर्किटेक्ट’

संगमनेर Live
0
बाळासाहेब थोरात हे तालुक्यांच्या सर्वागीण विकासाचे ‘आर्किटेक्ट’

 ◻️ राज्याच्या राजकारणातील ‘राजहंसा’ला वाढदिवसाच्या डॉ. सुधीर तांबे कडून शुभेच्छा!

​महाराष्ट्र ही संतांची, विचारांची आणि संघर्षाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या मातीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचे स्वप्न पेरले. याच स्वप्नांना सत्यात उतरवणारे, संयमी, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात.

​स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संस्कारांतून बाळासाहेबांचे नेतृत्व आकाराला आले. १९८५ मध्ये सर्वात तरुण लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज एका वटवृक्षासारखा विस्तारला आहे. राजकारणात पद मिळवणे सोपे असते, पण जनमानसात अढळ स्थान निर्माण करणे कठीण; बाळासाहेबांनी ते आपल्या कर्तृत्वाने साध्य केले आहे.

​संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हटवण्यासाठी बाळासाहेबांनी ‘निळवंडे’चा ध्यास घेतला. १९९९ मध्ये मंत्रिमंडळात संधी मिळाल्यावर त्यांनी कोणतेही मोठे खाते न मागता केवळ निळवंडे पूर्ण करण्यासाठी ‘पाटबंधारे राज्यमंत्री’ पद स्वीकारले. “आधी पुनर्वसन, मग धरण” हा त्यांचा मानवी दृष्टिकोन एका नव्या आदर्शाची निर्मिती करून गेला. आज जेव्हा त्या धरणाचे पाणी शिवारात खेळते, तेव्हा त्यामागे बाळासाहेबांच्या अनेक वर्षाची तपश्चर्या आणि जिद्द दिसते.

​बाळासाहेबांनी केवळ राजकारण केले नाही, तर समाजकारण आणि नगररचना यांचा सुरेख संगम साधला. संगमनेरमधील हायटेक बस स्थानक असो, भव्य तहसील कार्यालय किंवा कवी अनंत फंदी नाट्यगृह; प्रत्येक वास्तूतून त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडते. सकाळी ७ ते रात्री ११ अशी त्यांची अविरत काम करण्याची पद्धत आणि सलग आठवेळा मिळवलेला विक्रमी विजय हा त्यांच्यावरील जनतेच्या अतूट विश्वासाचा पुरावा आहे.

​२०१९ चा तो काळ आठवा, जेव्हा कॉग्रेस पक्ष मोठ्या संकटातून जात होता. अनेकजण साथ सोडून जात असताना, बाळासाहेबांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. “अडचणीत असताना पळायचे नसते, तर लढायचे असते,” हा मंत्र त्यांनी कार्यकर्त्याना दिला आणि मरगळलेल्या पक्षात चैतन्य फुंकले. त्यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि राज्याला एक स्थिर नेतृत्व मिळाले.

​कोरोनाच्या जागतिक संकटात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा राज्याचे महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात १८-१८ तास काम करत होते. प्रशासन आणि जनता यांच्यातील ते एक भक्कम दुवा ठरले. चक्रीवादळ असो की अतिवृष्टी, बळीराजाला सावरण्यासाठी ते नेहमीच बांधावर धावून गेले.

​बाळासाहेब म्हणजे केवळ एक नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या विकासाचे ‘आर्किटेक्ट’ आहेत. त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि त्यांच्या कृतीत पारदर्शकता आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढेच म्हणेन की, महाराष्ट्राच्या या ‘राजहंस’ नेतृत्वाचा प्रवास असाच यशस्वी आणि जनहितकारी राहो.

​बाळासाहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

लेखक डॉ. सुधीर तांबे हे माजी आमदार असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !