संगमनेरच्या विकासाचे महानायक - लोकनेते बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
संगमनेरच्या विकासाचे महानायक - लोकनेते बाळासाहेब थोरात 

◻️ ‘एक तालुका, एक परिवार’ संकल्पनेचे प्रणेते असलेल्या लोक नेत्यांचा ४० वर्षाच्या ध्येयप्रेरित प्रवासाचा आढावा

​महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आदर्श विकासाचे ‘मॉडेल’ म्हणून ज्यावेळी चर्चा होते, तेव्हा बारामती पाठोपाठ संगमनेर तालुक्याचा उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. मात्र, संगमनेरचे हे वैभव आणि प्रगती एका दिवसात साध्य झालेली नाही. यामागे कॉग्रेसच्या राष्ट्रीय वर्किग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मागील ४० वर्षाची अखंड तपश्चर्या, दूरदृष्टी आणि जनसामान्यांच्या हितासाठी घेतलेले अपार कष्ट कारणीभूत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने संगमनेरचा कायापालट केला आहे.

साहेबांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात संघर्षातून झाली. १९८९ मध्ये भंडारदर्‍याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी दिलेला लढा तालुक्याच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. या यशस्वी लढ्यामुळे संगमनेरला ३० टक्के पाणी मिळाले आणि त्यानंतर तालुक्यात पाईपलाईनचे जे जाळे विणले गेले, त्यातून इथली शेती खऱ्या अर्थाने बहरली. 

दुष्काळी तालुक्याला सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी केवळ जलसिंचनावरच भर दिला नाही, तर कृषी व्यवसायाला पूरक अशा दूध उत्पादनात क्रांती घडवून आणली. आज संगमनेरमध्ये दररोज सुमारे ९ लाख लिटर दूध उत्पादन आणि १५ लाख अंडी निर्मिती होत असून, ही श्‍वेत क्रांती शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेचा मुख्य आधार बनली आहे.

​तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बॅकिंग क्षेत्रात आज सुमारे १० हजार कोटींच्या ठेवी आहेत, ही बाब बाळासाहेबांच्या नियोजनाची आणि जनतेच्या त्यांच्यावरील विश्‍वासाची साक्ष देते. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी क्रांती केली असून, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी गावोगावी शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. 

विशेषतः तळेगावसह इतर दुष्काळी भागासाठी ‘वरदान’ ठरलेल्या निळवंडे धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. १९९९ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना अनेक राजकीय आणि तांत्रिक अडचणींवर मात करत त्यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून घेतले, ज्याचा लाभ वर्तमानकाळसह भविष्यकाळातील अनेक पिढ्यांना मिळणार आहे.

​महसूल, कृषी, शिक्षण आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना साहेबांनी प्रत्येक खात्याला ‘लोकाभिमुख’ बनवले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून ते सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठीचे साधन आहे, हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला. २०२४ च्या निवडणुकीतील अनपेक्षित निकालानंतरही ते डगमगले नाहीत, उलट अधिक जोमाने ते जनतेमध्ये सक्रिय आहेत. 

नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हेच दर्शवते की, जनतेची नाळ आजही थोरात साहेबांशी घट्ट जोडलेली आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना केवळ घोषणा नसून ती संगमनेरची संस्कृती बनली आहे.

​आजही तोच रुबाब, तीच गर्दी आणि तोच आदर कायम असून, येणारा काळ हा साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे. अशा या विकासाच्या महानायकाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छां!

​लेखक श्री. नामदेव कहांडळ हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे माध्यम समन्वयक असून लोकप्रिय निवेदक देखील आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !