कोंची गावाचे शेतकरी पुत्र नितीन गिते नेट परीक्षा उत्तीर्ण!
◻️ नितीन गिते यांची ‘सहाय्यक प्राध्यापक' पदाला गवसणी
संगमनेर LIVE | जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण काय साध्य करू शकतात, याचंच एक उत्तम उदाहरण संगमनेर तालुक्यातील कोंची येथील नितीन किसन गिते यांनी घालून दिलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (UGC) घेण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेची ‘नेट’ (NET) परीक्षा नितीन गिते यांनी मराठी विषयातून उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या या केंद्रीय परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नितीन गिते यांचा जीवनप्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून पूर्ण केले.
शिक्षणाची जिद्द इतकी प्रबळ होती की, महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लोणी आणि संगमनेर येथील कापड दुकानात प्रामाणिकपणे काम करत आपला चरितार्थ चालवला आणि उच्च शिक्षणही पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांचे बंधू सचिन गिते हे देखील यापूर्वी पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोंची सारख्या एका छोट्या गावातील दोन सख्ख्या भावांनी कठीण परिश्रमातून मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.
गेल्या १५ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करणारे नितीन गिते सध्या प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आणि संस्थेच्या सीईओ डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच अतिरिक्त सीईओ डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत पाटील घोगरे, अतांत्रिक संचालक प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्य विजय आहेर आणि उपप्राचार्य महेश गौरखेडे यांनीही नितीन गिते यांच्या कष्टाचे कौतुक केले आहे.
दरम्यान या यशाचे श्रेय नितीन गिते यांनी आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाला आणि मार्गदर्शकांना दिले आहे. त्यांना या प्रवासात प्रा. डॉ. राजेंद्र वडमारे, प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर, प्रा. डॉ. शांताराम चौधरी व प्रा. डॉ. सुवर्णा घोलप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली आहे.