कर्तृत्वाचा वटवृक्ष आणि मायेची सावली; आमचा लाडका ‘भाऊ’
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सौ. दुर्गाताई तांबे यांनी लिहिलेला हृदय स्पर्शी लेख!
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर ज्या काही निवडक घराण्यांनी पिढ्यानपिढ्या मूल्यांची जपणूक केली, त्यात ‘थोरात पाटील’ परिवाराचे नाव आदराने घेतले जाते. कष्टाळू वृत्ती, सर्वधर्मसमभाव, पुरोगामी विचार आणि अध्यात्मिकता या गुणांचा वारसा जोर्वेच्या मातीत रुजलेल्या या कुटुंबाने जपला आहे.
समृद्ध वारसा आणि बालपण
अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठी वसलेले ऐतिहासिक ‘जोर्वे’ हे आमचे गाव. आमचे पंजोबा गंगाराम पाटील आणि पंजी मंजुळाबाई यांचा गावात मोठा दरारा आणि आदर होता. हाच वारसा पुढे माझे वडील स्व. भाऊसाहेब थोरात आणि आई मथुराबाई यांनी समर्थपणे चालवला. ७ फेब्रुवारी १९५३ रोजी संगमनेर खुर्द येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. चार बहिणींचा हा लाडका भाऊ, ज्याला आम्ही प्रेमाने ‘भाऊ’ म्हणतो आणि पुढची पिढी ‘आबा’ म्हणून ओळखते.
ग्रामीण संस्कारात वाढलेल्या भाऊंना लहानपणापासूनच कष्टाची सवय होती. शेतीची कामे असोत किंवा ट्रॅक्टर चालवणे, त्यांनी प्रत्येक गोष्ट मनापासून केली. एकदा इंजिन दुरुस्त करताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, पण कामाचा उत्साह कधीच कमी झाला नाही.
वाचनसंस्कृती आणि विचारांची जडणघडण
आमच्या घरी आजोबांपासूनच ग्रंथांचा मोठा संग्रह होता. स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांपासून ते जागतिक क्रांतीच्या इतिहासापर्यंत अनेक पुस्तके घरात होती. वडिलांना स्वातंत्र्य चळवळीतील वास्तव्यामुळे वाचनाची गोडी लागली होती, तीच परंपरा भाऊंनी पुढे नेली. आज त्यांच्याकडे समृद्ध ग्रंथालय आहे, जे त्यांच्या प्रगल्भ विचारांचे मुख्य स्त्रोत आहे.
संस्कारांची शिदोरी: सर्वधर्मसमभाव आणि निर्भयता
आमच्या कुटुंबात जाती-पातीला कधीच थारा नव्हता. मुस्लिम समाजातील 'चाँदबीबी' आमच्यासाठी आईसारखीच होती, तर चांभार समाजातील ‘सावित्रीमामी’ आमच्याकडे स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळत. अंधश्रद्धेला आमच्या घरात कधीच जागा नव्हती. सातवीत असताना अमावस्येच्या रात्री एकट्याने अंधारात जाऊन गुळ घेऊन येणारे भाऊ आजही तितकेच निधड्या छातीचे आहेत.
संघर्षातून नेतृत्व आणि सहकाराची उभारणी
भाऊंचे नेतृत्व केवळ पदाने नाही, तर कर्तृत्वाने घडले आहे. विडी कामगारांचे प्रश्न असोत किंवा पाणी पंचायतीचे आंदोलन, त्यांनी नेहमीच कष्टकऱ्यांची बाजू घेतली. १९८० मध्ये कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांनी कारावासही भोगला. १९८५ मध्ये जनतेने त्यांना सर्वात कमी वयाचा ‘अपक्ष आमदार’ म्हणून विधानसभेत पाठवले आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, तो आजही अविरत सुरू आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा महान नेत्यांच्या सहवासात भाऊंचे व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले. राजकारणात कोणाचे पाय ओढणे किंवा गोड बोलून पाठीत वार करणे, ही वृत्ती त्यांच्यात कधीच नव्हती. जे काही बोलायचे ते स्पष्ट आणि तोंडावर, हा त्यांचा स्वभाव आजही कायम आहे.
सहकार आणि विकासाचे ‘संगमनेर मॉडेल’
आज जिथे महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत, तिथे संगमनेरचा सहकार दिमाखात उभा आहे. ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना’ असो किंवा ‘राजहंस’ दूध संघ, भाऊंच्या दूरदृष्टीमुळे या संस्थांनी गुणवत्तेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. साखर कारखान्यात दारूचा परवाना मिळूनही केवळ सामाजिक नैतिकतेसाठी त्यांनी इंडस्ट्रिअल अल्कोहोल बनवण्याचा निर्णय घेतला, हे त्यांच्या उच्च विचारांचे प्रतीक आहे.
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल आणि फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि एआय (AI) ची आवड असणारे भाऊ नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात.
एक हळवा बंधू
राज्याचा व्याप आणि मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी कौटुंबिक कर्तव्ये कधीच विसरली नाहीत. आम्ही बहिणी पुण्यात शिकत असताना आम्हाला नेण्या-आणण्याची जबाबदारी असो किंवा सासरी पोहोचवणे असो, भाऊंनी नेहमीच मोठ्या भावाची माया दिली. वडिलांच्या पश्चात ‘दंडकारण्य’ सारखी पर्यावरण चळवळ त्यांनी प्राणपणाने जपली आहे.
माझे वडील नेहमी म्हणायचे, “बाळासाहेब कर्तृत्ववान आहे, म्हणूनच तो हे सर्व समर्थपणे सांभाळत आहे.” आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चौघी बहिणी देवाकडे एकच प्रार्थना करतो की, आमच्या या लाडक्या बंधूचा वेल असाच बहरत राहो.
चवघी आम्ही बहिणी, योकच भाऊराया
झाकुनी गेल्या, मोगऱ्याखाली काया ।।१।।
बहिण भावंडाची माया, अंतर काळजाची
पिकल सिताफळ, त्याला गोडाई साखरेची ।।२।।
माहेरीच्या देवा, नाही तुला मी विसरत
पाठीचा बंधुजीचा, वेल जावु दे पसरत ।।३।।
माझ्या या आयुष्याची देवा, आखुड घालदोरी
हौशी बांधवाला माझ्या, घाल शंभर पुरी ।।४।।
शुभेच्छुक :-
सौ. दुर्गा सुधीर तांबे
अध्यक्षा, जयहिंद महिला मंच.
माजी नगराध्यक्षा, संगमनेर
9822553254