संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर शुक्रवारी पोलिसांचा पुन्हा छापा
◻️ एलसीबीने कारवाई करत साडेपाच लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) पहाटेच्या सुमारास संगमनेरमधील ‘जमजम कॉलनी’ परिसरात हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे १५०० किलो गोमांस आणि दोन जिवंत जनावरांसह एकूण ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या होत्या. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने संगमनेर शहरात गोपनीय माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, जमजम कॉलनीमध्ये सोहेब कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह बेकायदेशीररीत्या गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने पहाटेच्या सुमारास जमजम कॉलनीतील संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही इसम प्रत्यक्ष कत्तल करताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पत्र्याच्या शेडच्या मागील दरवाजाने अंधाराचा फायदा घेऊन पळणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला आणि त्यापैकी सोहेब कुरेशी (संगमनेर) याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे दोन साथीदार साहील कुरेशी आणि अयान कुरेशी हे पोलिसांना चकवा देऊन पसार होण्यात यशस्वी झाले.
या धडक कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण १५०० किलो गोमांस, १ लाख रुपये किमतीची दोन जिवंत गोवंशीय जनावरे, ३ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरलेले ३०० रुपये किमतीचे दोन लोखंडी सुरे असा एकूण ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित २०१५ मधील कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवल्याप्रकरणी कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले आणि अरुण मोरे यांच्या पथकाने पार पाडली.