लोणी मध्ये जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन

संगमनेर Live
0
लोणी मध्ये जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन

◻️ ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने मैदान गजबजणार


संगमनेर LIVE (लोणी) | जलसंपदा विभागाच्या वतीने लोणी येथे दि. ७ ते ९ फेब्रुवारी २०२६  रोजी राज्यस्तरीय ‘पंचम क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे’ आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या सर्व महामंडळाच्या अंतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचार्याचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे. ‘खेळात सशक्त, सेवेत समर्थ' असे घोषवाक्य यंदाच्या स्पर्धेचे आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धाचे यजमान पद गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याने स्विकारले असून लोणी आणि शिर्डी येथे या स्पर्धाच्या नियोजनाची जय्यत तयारी विभागाने सुरू केली आहे.

स्पर्धाचे उद्घाटन दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून जिल्ह्यातील अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो खो पटू श्‍वेता गवळी बेसबाॅल पटू अक्षय आव्हाड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धाचे उद्घाटन होणार असून जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या शानदार उद्घाटन सोहळ्यास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह पाचही  महामंडळाचे कार्यकारी संचालक उपस्थित राहाणार आहेत.

तीन दिवसांच्या या स्पर्धेत सर्व अधिकारी कर्मचारी क्रिकेट, कबड्डी, टेबल टेनिस, व्हाॅलीबाॅल टेबल टेनिस बुध्दीबळ, कॅरम, अ‍ॅथेलेटिक्स, जलतरण,या क्रिडा प्रकारांच्या स्पर्धामध्ये जलसंपदा विभागाचे मंत्रालयीन, महामंडळाच्या अंतर्गत येणार्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालय आणि सैनिकी स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

स्पर्धेचा समारोप ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार असून या समारंभास जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. शुभांगी दळवी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वेटलिफ्टींग पटू कोमल वाकळे आंतरराष्ट्रीय साॅफ्ट खेळाडू फिजा सय्यद यांच्या उपस्थितीत होणार असून समारंभास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहाणार आहेत.

दरम्यान, तीन दिवसांच्या स्पर्धाची विभागाने सुरू केलेली तयारी अंतिम टप्प्यात आहे. नियोजनासाठी अहिल्यानगर जलसंपदा विभागाने समित्या गठीत केल्या असून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या क्रिडा विभागाचे सहकार्य संयोजन समितीला मिळत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !