शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचा ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून गौरव!
◻️ धार्मिक आणि सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय दखल
संगमनेर LIVE (शिर्डी) | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थानच्या अद्वितीय आणि व्यापक कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली असून, ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून संस्थानला प्रतिष्ठित ‘ॲानर सर्टिफिकेट’ देऊन गौरविण्यात आले आहे.
श्री साईबाबांच्या कृपेने जगभरातील भाविकांसाठी सेवाकार्य करणाऱ्या या संस्थेच्या धार्मिक, सामाजिक आणि विशेषतः मानवसेवेतील योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहोर उमटली आहे.
हा जागतिक सन्मान प्रदान करण्यासाठी ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे अध्यक्ष आणि स्वतः १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके यांनी शिर्डी येथे विशेष भेट दिली. त्यांच्या हस्ते हे मानाचे ‘ॲानर सर्टिफिकेट’ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, अतुल वाघ, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थान केवळ एक धार्मिक केंद्र नसून, अत्याधुनिक रुग्णालय, विशाल प्रसादालय आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ ठरले आहे. या जागतिक मान्यतेमुळे संस्थानच्या पारदर्शक आणि सेवाभावी कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख आणि गौरव प्राप्त झाला आहे. संस्थान सातत्याने करत असलेल्या या कार्यामुळे जगभरातील साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.