शिर्डीत क्रिकेट स्टेडियम तर, निमगावजाळीत ‘बिबट सफारी'मुळे पर्यटनाला बुस्ट!

संगमनेर Live
0
शिर्डीत क्रिकेट स्टेडियम तर, निमगावजाळीत ‘बिबट सफारी'मुळे पर्यटनाला बुस्ट!

◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडला विकासाचा ‘हायटेक’ आराखडा


संगमनेर LIVE (खडकेवाके) | आगामी काळात शिर्डीची ओळख केवळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून न राहता, ती क्रीडा आणि निसर्ग पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित केली जाईल. शिर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारून तिथे आयपीएलचे सामने भरवण्याचे माझे स्वप्न असून, येत्या दोन ते तीन वर्षात ते नक्कीच पूर्ण होईल, असा विश्‍वास माजी खासदार आणि युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील दूधेश्‍वर येथे ३५ कोटी रुपये खर्चून भव्य ‘बिबट सफारी' प्रकल्प उभारण्यात येणार असल्याबाबत सविस्तर चर्चा केली.

​शिर्डी हे छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, जवळूनच समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

मात्र, केवळ पायाभूत सुविधांवर थांबून चालणार नाही, तर तरुणांच्या हाताला काम मिळायला हवे, यावर भर देत डॉ. विखे पाटील यांनी सध्याचे राजकारण हे पळत्या घोड्यासारखे वेगवान झाल्याचे सांगितले. “केवळ रस्ते बांधणे किंवा सुख-दुःखाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे म्हणजे लोकप्रतिनिधीचे काम नाही, तर लोकांच्या हाताला शाश्‍वत रोजगार देणे आणि सर्वसमावेशक विकास करणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

​नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध प्रकल्पांची माहिती देताना ते म्हणाले, कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेल्या २५ कोटींच्या निधीतून विकासकामांना सुरुवात झाली असून, यात निघोज ते पिपरी निर्मळ बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण आणि शिर्डी विमानतळाच्या नूतनीकरणाचा समावेश आहे. याचबरोबर जलसिंचनाला गती देण्यासाठी गोदावरी उजव्या कालव्यांच्या आणि वितरकांच्या नूतनीकरणासाठी तब्बल १५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 

विकासाचा हा समतोल राखतानाच आरोग्य सेवेसाठी राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीकरणाकरिता १५ कोटींचा निधी आणि जलसंपदा विभागाची जागा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून शिर्डीत दोन भव्य आणि कलात्मक स्वागत कमानी उभारल्या जाणार असून, राहाता शहरातील ‘कात नाला’ भुयारी करून त्यावर बाजारतळाचे विस्तारीकरण करण्याच्या एका अत्यंत नाविन्यपूर्ण योजनेवरही विचारविनिमय सुरू असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान ​पत्रकार हे समाजाचा आरसा असून, अनेकदा राजकीय कार्यकर्त्याना जी सत्य परिस्थिती सांगता येत नाही, ती पत्रकारांच्या माध्यमातून समजते. हा निर्भीड फीडबॅकच लोकप्रतिनिधींना योग्य दिशा देण्याचे काम करतो, अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !