आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. बुधवारी (दि. १८) हा वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटांतील तरुणांमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या बाजार तळावरील पटांगणातचं हाणामारी झाली. पोलीसांसमोरचं घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोधळ निर्माण झाला होता. अखेर जमावाला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर जमाव पागवण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी की, आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी दोन्ही बाजूकडील मंडळी बुधवारी दुपारी आश्वी पोलीस ठाणे येथे आली होती. यावेळी पोलीस स्टेशनच्या समोर दोन्ही बाजूकडून चर्चा आणि वाद मिटवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, तरुणांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन हाणामारीची दुर्दैवी घटना घडली.
अवघ्या काही फुटाच्या अंतरावर उभ्या असलेल्या पोलीसामोरचं तरुण एकमेकांना भिडल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या इतर नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. याप्रसंगी जमावाला पांगवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खमकी भूमिका घेतली. पोलिसांच्या धाकामुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे वाद घालणारा जमाव तात्काळ पागला गेला.
दरम्यान या घटनेनंतर हाणामारी करणाऱ्याची माहिती घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू असून त्यांच्यावर पोलीस स्वतः गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.