पुढील शिवजयंती पर्यत स्मारकाचे काम पूर्ण करणार - विखे पाटील
◻️ संगमनेरमधील शोभायात्रेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर LIVE | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एक कोटी रूपयांचा निधी यापुर्वीच मंजूर केला असून, पुढील शिवजयंती पर्यत स्मारकाचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सकल हिंदू समाज आणि महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्म सोहळ्यास उपस्थित राहून मंत्री विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून भव्य शोभायात्रेचा शुभारंभ केला. आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. संगमनेर येथील स्मारकाच्या जागेचा प्रश्न येत्याकाही दिवसात मार्गी लागणार असून लवकरच स्मारकाचे काम सुरू होईल यासाठी निधीची कमरता भासणार नाही अधिकचा निधी देण्याची तयारी असून पुढील शिवजयंतीपर्यत स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हणाले.
देशात अनेक राजे रजवाडे होवून गेले पण आपल्या कर्तबगारीने शिवाजी महाराज संपूर्ण विश्वात अजरामर झाले. अठरा पगड जाती जमातींना बरोबर घेवून रयतेचे राज्य ही संकल्पना त्यांनी कृतीत उतरवली. सामाजिक धार्मिक तेढ निर्माण न करता स्थापन झालेले स्वराज ही मोठी देण असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अमोल खताळ यांनी शिवस्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून संगमनेरकर नागरीकांची स्मारकाची मागणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. महायुतीच्या वतीने सर्व महापुरूषांचे जयंती सोहळे साजरे करण्याची प्रथा सुरू केली असून यावर्षीचा दुसरा शिवजयंती सोहळा तेवढ्याच उत्साहात संपन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. शोभायात्रेत अनेक चित्ररथ, ढोल पथक भजनी मंडळ योगा प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी महीला कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.