युवा शक्तीला समर्पित आणि प्रगतीला वेग देणारा अर्थसंकल्प - मंत्री विखे पाटील
◻️ कृषी सिंचन, ग्रामीण अर्थव्यवस्था, कौशल्य विकास ते एआय तंत्रज्ञानाला नवसंजीवनी मिळणार
संगमनेर LIVE (शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील युवा शक्तीला समर्पित असून, “तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या स्वप्नांचा सन्मान” करणारा अर्थसंकल्प आहे. शिक्षणापासून ते रोजगारा पर्यतच्या पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पातून बळकटी मिळेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, रचनात्मक सुधारणांवर भर, उत्पादन क्षमतेत वाढ आणि लोकांची क्रयशक्ती वाढविण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि देशाला ज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे पुढे घेवून जाण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरेल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
अर्थसंकल्पा मध्ये देशातील युवकांच्या शिक्षणा बरोबरच रोजगार निर्मितीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. उद्योगांना पाठबळ देतानाच यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प तेवढाच महत्वाचा आहे. कौशल्य विकास आणि एआय तंत्रज्ञानाच्या युगात देशातील युवकांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, वस्रोद्योग हातमाग आणि चर्मोद्योगाला नव्या संधीचा मार्ग या अर्थसंकल्पाने दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळेल.
प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थीनींसाठी वसतीगृह निर्माण करणे, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात भारताला अधिक सक्षम करण्यासाठी दहा वर्षांकरीता खेलो इंडीया मिशन तसेच कौशल्य विकासासाठी ट्रेनिंग सेंटर विकसीत करणे या अर्थमंत्र्यांच्या घोषणांचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत केले आहे.
मधुमेह आणि कॅन्सरवरील १७ औषधांवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि अपघात विमा रक्कम करमुक्त करण्याचा मोठा दिलासा आजच्या अर्थसंकल्पाने दिला आहे. भारताला मेडीकल टुरिझमचे मुख्य केंद्र बनविण्यासाठीचे प्रयत्न महत्वपूर्ण आहेत. भारतीय संस्कृती मध्ये असलेले आयुर्वेदाचे महत्व जागतिक स्तरावर आधोरेखित करण्यासाठी नवीन आयुष पॉलिसी जाहीर करण्यात आली आहे. आयुर्वेदा मध्ये संशोधन करण्यासाठी तीन नव्या संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना अर्थसहाय्य करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवितानाच ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारुन यामध्ये महिलांना प्राधान्य देणे कृषि क्षेत्रात एआय तंत्रज्ञनाला प्रोत्साहन सिंचन क्षेत्रात गुंतवणूक तसेच लखपती दिदिच्या उत्कर्षासाठी नव्या संधी आणि पर्यटन विकासामध्ये रोजगार निर्मितीला आजच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकारा वर्षाच्या यशस्वी वाटचालीत विकासाला गती देणारा विकसित भारताचा रोडमॅप अर्थसंकल्पातून स्पष्ट झाला असून जगात सर्वाधिक सात टक्क्यांचा विकास दर साध्य करताना जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात ठळकपणे दिसून येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.