धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेचा ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न

संगमनेर Live
0
धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेचा ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न 

◻️ छोट्या उद्योजकाची शाळेच्या आवारात पुस्तकी ज्ञानाला कष्टाची जोड! 


संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारातील दिघेवस्ती येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शिक्षणासोबतच व्यवहारचातुर्याचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंद मेळाव्या’त विद्यार्थ्यांनी केवळ वस्तूंची विक्रीच केली नाही, तर अवघ्या तीन तासांत तब्बल ३५ हजार ८४२ रुपयांची विक्रमी उलाढाल करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता पहिली ते चौथीतील या लहानग्यांनी 'शिकून कमवा' ही संकल्पना ज्या पद्धतीने प्रत्यक्ष कृतीत उतरवली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​हा मेळावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता, तर लहान वयातच विद्यार्थ्याना नफा-तोटा, पैशांचे नियोजन, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास मिळावा, या हेतूने शाळेने या उपक्रमाचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःहून स्टॉल्सची आखणी केल्यामुळे त्यांच्यात उद्योजकतेची बीजे रोवली गेली. 

या मेळाव्यात खाऊच्या पदार्थांपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूं पर्यंत मोठी रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये पाणीपुरी, अप्पे, पॅटीस, इडली-सांबर, डोसा, दाबेली, वडापाव, भजी आणि ओली भेळ अशा चटपटीत पदार्थांची चव चाखण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच उन्हाळ्याची चाहूल लागत असताना सरबत, बदाम शेक आणि मठ्ठा या पेयांनाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली.

​खाद्यपदार्थाशिवाय विद्यार्थ्यानी ताजी फळे, भाज्या, तृणधान्ये, शालेय साहित्य आणि सुगंधी फुलांचे गजरे अशा विविध वस्तूंचे स्टॉल्सही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मांडले होते. सकाळी १० ते दुपारी १ या अवघ्या तीन तासांच्या वेळेत शालेय परिसर एखाद्या जत्रेसारखा फुलून गेला होता. विद्यार्थ्यानी अत्यंत नम्रपणे ग्राहकांशी संवाद साधला, वस्तूंच्या किमती सांगितल्या आणि हिशोब करून सुट्टे पैसे परत देण्याची जबाबदारी चोख पार पाडली. पालकांनी आणि ग्रामस्थांनीही आपल्या मुलांमधील हे व्यावसायिक कौशल्य पाहून भरभरून खरेदी केली.

​दिवसअखेरीस प्रत्येक गटाने आपल्या स्टॉलचा स्वतंत्र हिशोब मांडला. एकूण विक्रीतून झालेला खर्च वजा करून नफा आणि तोटा याचे विश्लेषण करताना विद्यार्थ्यांना गणिताचा पुस्तकाबाहेरचा प्रत्यक्ष उपयोग समजला. ‘कष्टार्जित' कमाईचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

दरम्यान या मेळाव्याच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक संघाने विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम धानोरे पंचक्रोशीत कौतुक आणि चर्चेचा विषय ठरला आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !