'जलजीवन’च्या अपूर्णतेमुळे तहानलेल्या गावांसाठी तत्काळ टँकर सुरू करा!

संगमनेर Live
0
'जलजीवन’च्या अपूर्णतेमुळे तहानलेल्या गावांसाठी तत्काळ टँकर सुरू करा!

◻️​ आमदार अमोल खताळ यांच्या टंचाईपूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना


संगमनेर LIVE | ​महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ‘जलजीवन मिशन’च्या अनेक योजना केवळ कागदोपत्री पूर्ण दाखविल्या गेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात अनेक गावे तहानलेलीच आहेत. योजना ‘पूर्ण’ असूनही पाणी मिळत नसल्याने संगमनेर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत, “कागदोपत्री सोपस्कार बाजूला ठेवा आणि पाणीटंचाई जाणवताच गावांना तत्काळ टँकर सुरू करा,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

​संगमनेर तालुक्यात आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते.

​बैठकीत पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीवर बोट ठेवताना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील वर्षी तालुक्यात केवळ २१ टॅकर सुरू होते. मात्र, सध्या ज्या भागात जलजीवन योजना राबविल्या गेल्या आहेत, तिथेही शाश्वत पाण्याचा स्रोत नसल्याने ओरड आहे. विशेषतः सायखिंडी व पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांवर अद्यापही पाण्याची वानवा आहे. काही ठिकाणी योजनांचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी, नळाला पाणी येत नाही. त्यामुळे अशा गावांचे सर्वेक्षण करून तिथे प्रशासकीय अडचणींचे कारण न देता टॅकर सुरू करण्याचे आदेश आमदारांनी दिले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंता शैलेजा डावखरे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त जलसंधारण व ग्रामपाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले होते.

​आमदारांनी प्रशासनाला निर्देश देताना स्पष्ट केले की, ज्या गावांमधून टॅकरची मागणी येईल, त्यांचे प्रस्ताव विनाविलंब तयार करण्यात यावेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. तसेच, पाणीपुरवठा योजनांमध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, कारण पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून तो कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहिला पाहिजे, असे त्यांनी निक्षून सांगितले.

​“टंचाईच्या काळात तालुक्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याविना राहावे लागू नये, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. जिथे गरज असेल तिथे तत्काळ प्रस्ताव तयार करा. नागरिकांना पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क अबाधित राहिला पाहिजे. यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.” असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !