विद्यार्थ्यानी ध्येयनिष्ठ राहून समाजोपयोगी कार्य करावे - डॉ. सुभाष काकडे
◻️ म्हैसगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE (म्हैसगाव) | राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील डॉ. काकडे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यासाठीचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि तितक्याच भावनिक वातावरणात पार पडला. शालेय जीवनातील आठवणी आणि भविष्यातील स्वप्नांचा मेळ या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सात्रळ येथील कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. गारुडकर यांच्यासह केदारेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. मुसळे आणि व्याख्याते निलेश पर्बत हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष काकडे यांनी विद्यार्थ्याना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यानी स्वतःवर आत्मविश्वास ठेवून समाजोपयोगी कार्य करावे आणि जीवनात यशस्वी होताना आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये.” असे आवाहन केले.
प्राचार्य एस. एन. गारुडकर यांनी विद्यार्थ्याच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तर, व्याख्याते निलेश पर्बत यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून विद्यार्थ्याना आयुष्यात कष्टाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी बारावीच्या अनेक विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थ्याचे डोळे पाणावले होते. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाचे हे क्षण अत्यंत भावनिक ठरले.
दरम्यान या प्रसंगी प्राचार्य संभाजी माने, प्रा. गागरे, यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती म्हैसगाव येथील पत्रकार कमलेश विधाटे यांनी कळविली आहे.