शिर्डीत धनगर आरक्षण आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन!

संगमनेर Live
0
शिर्डीत धनगर आरक्षण आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन!

◻️ “घटनेने दिले, पण अंमलबजावणी कधी?” धनगर बांधवांचा शिर्डीतून एल्गार!


संगमनेर LIVE (​शिर्डी) | महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘एस. टी. आरक्षण’ अंमलबजावणीच्या मुद्द्याने आता निर्णायक वळण घेतले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेले आरक्षण अद्यापही कागदावरच राहिल्याने समाजाचा संताप वाढत आहे. 

या पार्श्वभूमीवर, आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी एक मोठा मुक्तीसंग्राम पुकारण्यात आला असून, त्याची महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक राज्यस्तरीय नियोजन बैठक बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साई पालखी निवारा येथे संपन्न होणार आहे.

​या बैठकीला धनगर समाजाच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे मल्हारयोध्दे दीपक बोऱ्हाडे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख उपोषणकर्ते, आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्वाचित नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांसह समाजाचे सर्वच स्तरांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

या महत्त्वपूर्ण बैठकीचा मुख्य उद्देश मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक ‘धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम’ लढ्याची संपूर्ण पूर्वतयारी करणे हा आहे. आरक्षणाची ही लढाई आता शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात नेण्यासाठी, तसेच सरकारवर प्रभावी दबाव निर्माण करण्यासाठी या बैठकीत विशेष रणनीती आखली जाणार आहे.

​विजय तमनर आणि संयोजन समितीने याप्रसंगी आवाहन केले आहे की, “घटनेने दिलेला आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, हा लढा आता आरपारचा आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची वज्रमूठ बांधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांनी शिर्डीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकता दाखवून द्यावी.” असे आवाहन केले.

दरम्यान या मुक्तीसंग्रामाच्या बैठकीमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता असून धनगर समाजाच्या या राज्यस्तरीय बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !