भारत-अमेरिका व्यापार करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचा घात? - डॉ. अजित नवले
◻️ अमेरिकेच्या निर्यातीवर सवलतीचा पाऊस, तर भारतीय मालावर कराचा बोजा
◻️ पियुष गोयल यांच्या दाव्यांवर डॉ. नवलेंकडून घणाघाती टीका
संगमनेर LIVE | आपल्या पराजयाला आणि मजबूरीला सुद्धा यश संबोधून लोकांना तसे भासवण्याचा उत्तम प्रयोग म्हणून पियुष गोयल यांच्या भारत-अमेरिका कराराबाबतच्या वक्तव्याकडे पाहावे लागेल, अशी सडकून टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे. हा करार म्हणजे भारतीय शेती आणि श्रमिकांना उद्ध्वस्त करणारा ‘घाट्याचा सौदा’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या करारातील धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकताना डॉ. नवले म्हणाले की, भारत सध्या व्यापाराचा विशेष दर्जा असलेल्या देशांकडून येणाऱ्या मालावर १६ टक्क्यांपासून ते ६४.३ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारतो. मात्र, या नवीन करारानुसार अमेरिकेसाठी हे शुल्क आता शून्य टक्के करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेचा स्वस्त माल भारतीय बाजारपेठेत विनासायास दाखल होईल, ज्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसून ती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
अमेरिकन शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक ६० लाख रुपयांची भरघोस सबसिडी, तिथली मोठी जमीनधारणा आणि जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्यांचा उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो. अशा परिस्थितीत शून्य टक्के शुल्काने अमेरिकन माल भारतात आल्यास सोयाबीन, कापूस, दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री आणि फळे उत्पादक भारतीय शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीबाबतही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी भारतीय मालावर अमेरिका साधारण ३.२५ टक्के कर लावत असे, जो आता १८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ५० टक्के वाढीची धमकी देऊन तो १८ टक्क्यांवर आणणे हा विजय नसून, उलट कर वाढल्यामुळे भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात घटणार आहे. या आर्थिक फटक्यासोबतच भारतीयांच्या आरोग्याचा प्रश्नही डॉ. नवले यांनी उपस्थित केला आहे.
या करारामुळे मांस मिश्रित पशु आहार वापरून तयार केलेले दूध आणि जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर केलेला शेतीमाल प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचणार आहे, ज्याचे दूरगामी आरोग्यविषयक परिणाम तपासणे आवश्यक आहे.सरकारने केवळ पत्रकार परिषदा घेऊन मोठे दावे करण्याऐवजी या संपूर्ण कराराचा तपशील संसदेपुढे आणि जनतेसमोर मांडला पाहिजे, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले आहे.
दरम्यान ‘तपशिलात ब्रह्मराक्षस सामावलेला असतो’ ही म्हण सार्थ ठरवत, जसे या कराराचे बारकावे समोर येतील तसे याचे भीषण वास्तव लोकांसमोर येईल, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने दिला आहे.