तळेगाव दिघे योजनेचे १० कोटींचे वीज बिल माफ करा- आमदार अमोल खताळ
◻️ घुलेवाडी ‘जल जीवन’च्या वाढीव खर्चाची चौकशी करण्याची विधिमंडळात केली मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांमधील कथित गैरप्रकार आणि थकीत देयकांच्या गंभीर प्रश्नावरून आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. घुलेवाडी येथील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या ‘हर घर जल’ योजनेच्या मूळ खर्चात झालेली मोठी वाढ संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या योजनेची सविस्तर माहिती देताना आमदार खताळ म्हणाले की, घुलेवाडी येथील या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवातीची अंदाजित किंमत ८१ कोटी रुपये इतकी होती. मात्र, सध्या या योजनेचा खर्च वाढून तो चक्क १२५ कोटी रुपयांपर्यत पोहोचला आहे. प्रस्तावित निधीमध्ये झालेली ही ४४ कोटी रुपयांची वाढ अत्यंत संशयास्पद असून, केवळ काही ठराविक राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या ठेकेदारांनाच ही कामे देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.
या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याने केवळ घुलेवाडीच नव्हे, तर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, जवळे कडलग, साकूर, निमगाव भोजापूर आणि अकलापूर या गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामकाजाचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, तळेगाव दिघे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, सध्या या भागातील पाणीपुरवठा सुरळीत नसतानाही या योजनेवर तब्बल १० कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. या थकीत बिलामुळे योजनेवर टांगती तलवार असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हे वीज बिल पूर्णपणे माफ करावे किंवा त्यामध्ये विशेष सवलत देऊन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केली.
दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात मांडलेल्या या सडेतोड भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता शासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.