संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

संगमनेर Live
0
संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

◻️ पालकमंत्री विखे पाटलांसह आमदार खताळ यांच्या हस्ते स्ट्रीट लाईटचा शुभारंभ


​संगमनेर LIVE | संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान किंवा त्यानंतर तातडीने स्वतंत्र बैठक बोलावली जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल आणि ग्रामस्थांना या त्रासातून मुक्त केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द प्रवरा नदी पुलापर्यतच्या महामार्ग चौपदरीकरणावरील स्ट्रीट लाईटच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नामदार विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, लोणी ग्रामपंचायतीने चार-पाच ग्रामपंचायतींना सोबत घेऊन कचरा प्रक्रियेचा एक आदर्श प्रकल्प उभा केला असून, असा उपक्रम राबवणारी ती राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. याच धर्तीवर संगमनेर खुर्दच्या कचरा डेपोबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला जाईल. 

हा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवल्यास तेथेही स्थानिक नागरिकांकडून विरोधाची शक्यता असल्याने, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत विशेष बैठकीत गांभीर्याने विचारविनिमय केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या या भागातील नागरिकांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असून, हा प्रश्न आता मार्गी लावला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​यावेळी पुणे-नाशिक महामार्गाच्या सुशोभीकरणाचा संदर्भ देत मंत्री विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून महामार्गावर पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. पथदिव्यांचा हा प्रकाश केवळ रस्त्यावरच नव्हे, तर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवरही पडला पाहिजे, असे सूचक विधान त्यांनी केले.

​आमदार अमोल खताळ यांनी यावेळी बोलताना महायुती सरकारने दिलेला विकासनिधी गावागावात पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्याना केले. ते म्हणाले की, आम्ही केवळ निवडणुकांसाठी नव्हे, तर लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असतो. संगमनेर खुर्दमध्ये कोणाचीही ‘दादागिरी’ सहन केली जाणार नाही आणि कार्यकर्त्यानी अन्यायाविरुद्ध ‘आरे ला कारे’ म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे. ज्या-ज्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक असताना भ्रष्टाचार झाला आहे, तो बाहेर काढून संबंधितांना शिक्षा होईपर्यत आमचा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान ​या कार्यक्रमाला भाजपचे नेते सुदाम सानप, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, भाऊसाहेब गुंजाळ, गुलाब शेख, बाळासाहेब शिंदे, प्रमोद राहणे, काशिनाथ पावसे, राजन शिंदे, रौफ शेख, शरद पावबाके, महेश मांडेकर, निलेश गुंजाळ, सचिन पावबाके, संकेत खुळे यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !