“गेल्या सव्वा वर्षात विकास निधी देण्यात कोणताही भेदभाव कधी केला नाही”
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ
संगमनेर LIVE | “गेल्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळात विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावा-गावात निधी पोहोचवण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले आहे. निधी वाटप करताना कधीही ‘आपला-परका’ असा भेदभाव केला नाही. उलट ज्या भागावर आजवर अन्याय झाला, त्या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने निधी देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे,” असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव, भोजापुर, चिकणी, सायखिंडी आणि मेंगाळवाडी या गावांमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका करताना म्हटले की, निवडणुका आल्या की केवळ भूमिपूजनाचे फलक लावून जनतेची दिशाभूल करण्याचे काम आजवर अनेकांनी केले आहे. मात्र, त्या फलकांचे आणि कामांचे पुढे काय झाले? याचा जाब आता जनतेनेच विचारण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारच्या काळात झालेला खरा विकास आता गावागावांत दिसत असून, तो लोकांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.
तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. निळवंडे डाव्या आणि उजव्या कालव्यांतून सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन्ही नद्या वाहत्या आहेत. या कालव्यांच्या माध्यमातून गावातील कोरडे पडलेले बंधारे आणि तलाव भरून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गुंजाळवाडीतील काही घटनांचा संदर्भ देत आमदारांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत कडक इशारा दिला. गावातील शांतता भंग करून काही जण भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्याना जर कोणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठामपणे उत्तर देणे गरजेचे आहे. आम्ही कधीही चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही, परंतु सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्याच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान यावेळी नामदेव गुंजाळ, राधुनाना गुंजाळ, संभाजी गुंजाळ, सूर्यभान गुंजाळ, पंढरीनाथ गुंजाळ, रोहिदास सोमनाथ जगताप, देवराज थोरात, विक्रम गुंजाळ, महेश जगताप, गोकुळ गुंजाळ, बबन हासे, सावळेराम खतोडे, आनाजी खडांगळे, आण्णा हासे, बाळासाहेब सोनवणे, ऋषिकेश हासे, गोपिनाथ सोनवणे, संदेश देशमुख, सोमनाथ खतोडे, कारभारी वलवे, सरपंच ज्योती कडलग, उपसरपंच प्रमोद कडलग, दत्तात्रय गुंजाळ, अशोक कानवडे, बाळासाहेब कडलग, लहानू चाबुस्कर, भाऊसाहेब धुमाळ, संतोष टपाले, त्र्यंबक फटांगरे, मनोहर कडलग, वाल्मिक शिंदे, सरपंच गायत्री माळी, उपसरपंच संदीप वर्पे, दिपक वर्पे, एकनाथ वर्पे, मच्छिंद्र विखे यांच्या सह महायुतीचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.