डॉ. विखे पाटलांच्या नगरमधील ‘जनता दरबारात’ नागरीकांच्या समस्यांचा निपटारा
◻️ राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत दिले मोठे संकेत!
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची या पदावर निवड झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये आगमन झाले. या निमित्ताने विळद घाट येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ला जिल्हाभरातून नागरिक आणि कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.
सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे प्रत्यक्ष भेटून ऐकून घेतले. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि विविध मागण्यांचे लेखी अर्ज त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. विखे पाटील यांनी प्रत्येक अर्जाची गांभीर्याने दखल घेत, संबंधित प्रश्नांचा योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आणि ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
तर, प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते; त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि घोषणाबाजी करत डॉ. विखे पाटील यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी आगामी राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “येत्या १० ते १२ मार्च दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. बंगाल, तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.” असे संकेत दिले.
स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरीच्या जागेवर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्याची प्रबळ भावना असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले. तथापि, या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेतील निष्ठावान कार्यकर्त्याना न्याय देणे आणि त्यांना योग्य स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.