प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचे जीवन सुलभ करणे हे आमचे उद्दिष्ट - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ अकोले तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत साहित्य आणि तपासणी शिबिराचे आयोजन
संगमनेर LIVE (अकोले) | अकोले तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे, या उद्देशाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘दिव्यांग तपासणी व नोंदणी’ शिबिराचे रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यत अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्याची नोंदणी करून त्यांना विविध अत्याधुनिक साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ८० टक्के अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तींसाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या, चालण्याच्या काठ्या, रोलेटर्स आणि बॅटरी चलित व्हीलचेअर यांसारखी उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. तसेच श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी अत्याधुनिक श्रवणयंत्रे आणि दृष्टीबाधितांसाठी ब्रेल किट, सुगम्य केन व विशेष स्मार्टफोनचे वितरण केले जाईल. याव्यतिरिक्त सेरेब्रल पाल्सी खुर्ची, एडीएल किट आणि टीएलएम किट यांसारख्या आवश्यक साधनांसाठी देखील पात्र लाभार्थ्याची तपासणी व नोंदणी केली जाणार आहे.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अकोल्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यत आधुनिक उपकरणे पोहोचवून त्यांचे जीवन सुलभ करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. या शिबिरादरम्यान केवळ नोंदणीच नाही, तर विखे पाटील मेमोरियल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांग बांधवांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पात्रता निकष व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही नोंदणी प्रक्रिया राबवली जाईल आणि नोंदणी झालेल्या लाभार्थ्याना ३१ मार्च २०२६ पर्यत अकोले येथेच या उपकरणांचे प्रत्यक्ष वितरण केले जाईल.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यानी आधार कार्ड आणि रेशन कार्डची मूळ प्रत तसेच प्रत्येकी एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्रतेची महत्त्वाची अट म्हणजे संबंधित दिव्यांग व्यक्तीने मागील तीन वर्षांत केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून अशी सहाय्यक साधने घेतलेली नसावीत.
दरम्यान अकोले तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी निश्चित करावी आणि आपले जीवन अधिक सोयीस्कर बनवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.