उद्या संगमनेरमध्ये ‘आई तुळजाभवानी'च्या भव्य देखाव्यांचा शुभारंभ!
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत रंगणार उत्सव सोहळा
संगमनेर LIVE | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ‘स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव सोहळा समिती’च्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त ‘आई तुळजाभवानी’च्या भव्य देखाव्याचे उद्घाटन उद्या गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी आमदार सत्यजीत तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा अधिक संस्मरणीय करण्यासाठी समितीने विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक उपक्रमांची आखणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उभारण्यात आलेला आई तुळजाभवानीचा भव्य देखावा, आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रसन्न मूर्ती नागरिकांसाठी पुढील तीन दिवस दर्शनासाठी खुली राहणार आहे.
उद्घाटनानंतर किल्ले शिवनेरी येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथकाचे वादन, शिवकालीन मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, भव्य एलईडी लाईट शो, फटाक्यांची आतिषबाजी आणि फ्लॉवर्स ब्लास्टर अशा विविध भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे.
दरम्यान संगमनेर शहर आणि तालुक्यातील तमाम शिवप्रेमी, नागरिक आणि माता-भगिनींनी या ऐतिहासिक सोहळ्याला आणि आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.