श्री क्षेत्र मांचीहिल येथे ‘कानिफनाथ महाराज’ यात्रोत्सवाचे आयोजन
◻️ गाथामूर्ती राऊत महाराज यांचे कीर्तन तर, नामवंत पैलवान हगाम्यासाठी राहणार उपस्थित
संगमनेर LIVE | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मांचीहिल येथे ‘चैतन्य श्री कानिफनाथ महाराज’ यांच्या भव्य यात्रोत्सवाला होळी सणापासून प्रारंभ झाला आहे. रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात हरिकीर्तन आणि दर्शन सोहळा साजरा होणार आहे. सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवासाठी मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थ सज्ज झाले असून, उत्सवकाळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
यात्रोत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रविवारी (दि. ८) सकाळी ८ वाजता श्री क्षेत्र मांचीहिल येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांचा मंगलमय अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर ८ ते ९.३० दरम्यान परंपरेनुसार मानाच्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघणार आहे.
भक्ती आणि ज्ञानाची गंगा भाविकांपर्यत पोहोचवण्यासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत गाथामूर्ती ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांचे अमृततुल्य कीर्तन पार पडणार आहे. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सोमवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्तीचा आखाडा भरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातून आलेले नामवंत पैलवान आपले कसब दाखवणार आहेत. या पैलवानांची वाजत-गाजत मिरवणूक देखील काढली जाणार आहे, त्यामुळे कुस्ती प्रेमीमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
दरम्यान यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, फुलांच्या आणि पताकांच्या मनमोहन सजावटीने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. मुलांसाठी आकर्षक रहाटगाडगे, लहान-मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने, मिठाई, स्टेशनरी, कटलरी आणि पूजा साहित्याची दुकाने मोठ्या संख्येने थाटण्यास सुरवात झाली आहे.
तर, यात्रेकरूच्या स्वागतासाठी मांचीहिल संस्थान सज्ज झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेऊन यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.