वडगावपान हल्ल्यातील जखमी मुलीवर प्रवरा रुग्णालयात यशस्वी उपचार!

संगमनेर Live
0
वडगावपान हल्ल्यातील जखमी मुलीवर प्रवरा रुग्णालयात यशस्वी उपचार!

◻️ तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्लास्टिक सर्जरी पूर्ण; मुलीचा उपचारांना उत्तम प्रतिसाद

संगमनेर LIVE (​लोणी) | संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे झालेल्या दुर्दैवी आणि भ्याड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर लोणी (ता. राहाता) येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अत्यंत युध्दपातळीवर उपचार सुरू आहेत. 

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या चिमुरडीची प्रकृती आता स्थिर असून ती डॉक्टरांच्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे, ही दिलासादायक बाब समोर आली आहे.

​घटनेचे गांभीर्य ओळखून प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील व विश्‍वस्त ध्रुव विखे पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णालयास भेट दिली होती. त्यांनी या मुलीवर सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमला विशेष सूचना दिल्या होत्या. 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रुग्णालयातील सर्जरी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोकूळ जोर्वेकर, प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत मुन आणि डॉ. आनंद दुगड यांच्या अनुभवी पथकाने प्राथमिक प्लास्टिक सर्जरीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या ही मुलगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या २४ तास देखरेखीखाली आयसीयूमध्ये असून तिला आवश्यक असलेली सर्व औषधे आणि वैद्यकीय सुविधा विनाविलंब पुरवल्या जात आहेत.

​या कठीण प्रसंगात जखमी मुलीच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनिताई विखे पाटील यांनी तातडीने भेट देऊन कुटुंबाला धीर देऊन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. 

तसेच पालकमंत्री नामदार विखे पाटील हे स्वतः या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून मुलीवरील उपचाराबाबत वेळोवेळी माहिती घेत आहेत. आमदार अमोल खताळ यांनीही रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन उपचाराबाबत माहिती घेतली आहे.

दरम्यान सध्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे आणि प्रा. डॉ. जोर्वेकर यांचे विशेष पथक मुलीच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मुलीला आता बराच आराम वाटत असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !