कर्तृत्व आणि वात्सल्याचा अखंड वारसा - सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात
◻️ यशवंतराव-वेणूताईंच्या विचारांच्या समृद्ध वारसदार असलेल्या सौ. कांचनताई थोरात यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
संगमनेर LIVE |
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘राजहंस’ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे, स्वच्छ आणि पारदर्शी कार्यकर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात. आज अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध राजकीय वारसा चालवणारे नेतृत्व म्हणून पाहतो.
पण या जनसेवेच्या यज्ञात त्यांना भक्कम साथ देणारी, कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात माऊलीच्या मायेने धावून जाणारी शक्ती म्हणजे सौ. कांचनताई थोरात. वेणूताई चव्हाणांचा तोच सात्विक आणि वात्सल्यमूर्ती वारसा आज कांचनताईंच्या रूपाने संगमनेरच्या भूमीत बहरताना दिसत आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या तांबवे गावच्या पाटील घराण्यातील कन्या ते प्रवरा काठच्या जोर्वे गावच्या थोरात घराण्याची सून, हा ताईचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. वडील शहाजीराव पाटील यांच्या राबत्या घरातून त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले.
विवाहानंतर त्यांना स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि सौ. मथुराबाई थोरात यांच्या रूपात सासरचे प्रेमळ आई-वडील मिळाले. जोर्वे येथील ‘संत सावली’ निवासस्थान म्हणजे एक गोकुळच असून, या गोकुळात ताई अशा काही एकरूप झाल्या की त्यांनी थोरात घराण्याचा दातृत्वाचा वारसा अधिक समृध्द केला.
संगमनेरमधील ‘सुदर्शन’ हे केवळ निवासस्थान नसून ते गोरगरीब आणि सामान्यांचे हक्काचे व्यासपीठ आहे. थोरात साहेब राजकीय कामात व्यस्त असताना, सुदर्शनवर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आदरातिथ्य कांचनताई अविरतपणे करतात, म्हणूनच त्या सर्वांसाठी ‘प्रेमळ वहिनी’ आहेत.
अत्यंत नम्र आणि प्रसिध्दीच्या झोतात न राहता काम करणाऱ्या ताईनी महिला सबलीकरणासाठी मोठे जाळे विणले आहे. सौ. दुर्गाताई तांबे यांच्या साथीने त्यांनी अनेक बचत गट कार्यान्वित करून हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जय हिंद महिला मंडळ, हिरकणी बचत गट आणि माऊली बहुउद्देशीय संस्था यांसारख्या माध्यमातून त्या आरोग्य शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे उपक्रम सातत्याने राबवत असतात. केवळ सामाजिकच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.
नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी साकारलेली यशोदेची भूमिका आजही भाविकांच्या स्मरणात आहे. दंडकारण्य अभियानासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, तालुक्यातील मुलींनी शिकावे आणि मोठ्या व्हाव्यात यासाठी त्या सदैव धडपडत असतात.
त्यांच्या या निस्वार्थी आणि समाजभिमुख सेवेची दखल घेत त्यांना पुणे येथे प्रतिष्ठेच्या ‘राज्यस्तरीय यशवंत-वेणू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर नाशिक येथे ‘जाणीव’ पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. हे पुरस्कार म्हणजे त्यांनी जपलेल्या माणुसकीच्या नात्याची आणि समृध्द वारशाची पावतीच आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि कार्यकर्त्याना नेहमीच खंबीर पाठबळ देणाऱ्या, प्रसिध्दीपासून दूर राहून जनसेवा करणाऱ्या सौ. कांचनताई थोरात खऱ्या अर्थाने सर्वासाठी ‘मायेची सावली’ ठरल्या आहेत. अशा या कर्तृत्ववान माऊलीस वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! त्यांचे आयुष्य आरोग्यदायी आणि सुखसमृध्दी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक श्री. नामदेव कहांडळ हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे माध्यम समन्वयक असून लोकप्रिय निवेदक देखील आहेत.