◻️ नगर-नाशिक कृती समितीचे संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
संगमनेर LIVE (राहाता) | निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उर्ध्व प्रवरा (निळवंडे-२) विभागाचे कार्यकारी अभियंता (संगमनेर-घुलेवाडी) यांना निळवंडे कृती समिती, नगर-नाशिक यांच्या वतीने नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले. यामध्ये पाणी आरक्षण, पाइप डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (P.N.D.)कामांतील दिरंगाई आणि उन्हाळी आवर्तनाचे नियोजन यांसारखे कळीचे प्रश्न ऐरणीवर आणत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, लाभक्षेत्रात सध्या पी.एन.डी. ची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांमध्येच खोदकाम करून ठेवले आहे. महिनोनमहिने ही कामे अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामात आणि वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. या गलथानपणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य मोबदला देण्याची ठाम मागणी समितीने केली आहे.
या ज्वलंत प्रश्नासोबतच, निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वारंवार निवेदने देऊनही पाणी आरक्षणाचा प्रश्न प्रशासनाने प्रलंबितच ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई अधिक भयंकर रूप धारण करू शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पाणी आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, मागील आवर्तनाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांची लागवड केली असून सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील ‘उन्हाळी आवर्तनाचे’ तातडीने नियोजन करून कालव्यात पाणी सोडावे, अन्यथा पिके जळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान या सर्व गंभीर प्रश्नांचा प्रशासनाने तातडीने व गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा. जर प्रशासनाने टोलवाटोलवी केली, तर निळवंडे कृती समितीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
याप्रसंगी निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष गंगाधर गमे, उत्तमराव घोरपडे, मच्छिंद्र काळे, सौरभ शेळके, निलेश शेळके आदी पदाधिकारी आणि शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.