महाडमध्ये उद्या काॅग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा
◻️ हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन राहणार उपस्थिती
संगमनेर LIVE (मुंबई) | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.
काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासह अनेक मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच काॅग्रेस पक्षाने कार्य केले आहे. काॅग्रेस पक्षाने सत्तेचा वापर हा नेहमीच महिला, वंचित, शोषित, दलित, आदिवासी, बहुजनांच्या कल्याणासाठी केला आहे. ज्या ऐतिहासिक घटनेने बाबासाहेबांनी क्रांतीचा पाया रचला त्या क्रांतीकारी घटनेची शताब्दी काॅग्रेस पक्षातर्फे साजरी करून बाबासाहेबांना व त्यांच्या क्रांतीला अभिवादन केले जाणार आहे. २० मार्च २०२६ ते २० मार्च २०२७ हे वर्ष काॅग्रेस पक्षातर्फे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे.
सामाजिक न्यायाशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समतेशिवाय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही प्रत्यक्षात अवतरणार नाही. हे लक्षात घेऊन ‘सामाजिक न्यायातून समतेकडे’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीने दिली आहे.