आरोपीच्या मुसक्या आवळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - मंत्री विखे पाटील
◻️ अॅसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची घेतली रुग्णालयात जाऊन भेट
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या वडगावपान येथील विद्यार्थीनीची जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलिस प्रशासन स्वस्त बसणार नसल्याची प्रतिक्रीय त्यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
अॅसीड हल्ला झालेल्या विद्यार्थीनीची प्रकृती अतिशय उत्तम असून, प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराच्या टिमने वेळीच घेतलेल्या सर्व काळजीमुळे शंभर टक्के रिकव्हरी झाली आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व औषध उपचार या विद्यार्थीनीला देण्यात येत असून, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आहारही सुरु असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह आधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थीनीच्या आईची मंत्री विखे पाटील यांनी रुग्णालयात भेट घेतली. या विद्यार्थीच्या उपचारांचा सर्व खर्च रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु असल्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करु नका, तपासा संदर्भात तुम्हाला काही माहीती द्यायची असेल तर ती तुम्ही पोलिस प्रशासनाला द्या. पोलिस त्यांच्या पध्दतीने तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.