‘सद्गुरु स्मृती पुरस्कार’ ह.भ.प. गोविंद महाराज मोरे यांना जाहिर - उध्दव महाराज मंडलिक

संगमनेर Live
0
‘सद्गुरु स्मृती पुरस्कार’ ह.भ.प. गोविंद महाराज मोरे यांना जाहिर - उध्दव महाराज मंडलिक 

◻️ उद्या रविवारी गोगलगावच्या पावन भूमीत होणार पुरस्काराचे वितरण

संगमनेर LIVE (​लोणी) | अध्यात्मिक क्षेत्रातील निस्सीम सेवा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणजे ‘सद्गुरु स्मृती पुरस्कार’. ब्रम्हलीन श्री संत सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असलेला हा मानाचा पुरस्कार यंदा वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गोविंद महाराज मोरे (काका) यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे मार्गदर्शक महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) व महंत कैलासगिरी महाराज यांनी ही घोषणा केली असून, या निर्णयाने संपूर्ण वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​मोरे महाराज हे नाव म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून अविरत चाललेली एक ‘गुरुसेवा’ आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र सराला बेटचे तत्कालीन महंत सोमेश्वरगिरी महाराज आणि नारायणगिरी महाराज यांच्या चरणी त्यांनी आपली निष्काम भक्ती अर्पण केली. गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या प्रहरात त्यांनी केलेली अहोरात्र विनावादन सेवा आजही जुन्या जाणत्यांच्या स्मरणात आहे. 

नारायणगिरी महाराजांच्या काळात कधी दोन तासांचे कीर्तन, तर कधी चक्री कीर्तनांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. केवळ कीर्तनच नव्हे, तर पंढरीची वारी, आळंदी, पैठण आणि त्र्यंबकेश्वर वारीमध्ये काकडा भजन आणि हरिपाठाच्या माध्यमातून त्यांनी संप्रदायाची ध्वजा सदैव उंच ठेवली. बाळकृष्ण महाराज यांच्या समवेतही त्यांचा मोठा कार्यकाल आध्यात्मिक सेवेत व्यतीत झाला आहे.

​जुन्या काळात जेव्हा आधुनिक प्रसार माध्यमे उपलब्ध नव्हती, तेव्हा आपल्या वाणीच्या जोरावर आणि सखोल अभ्यासाच्या बळावर मोरे महाराजांनी अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत भक्तिचा मळा फुलवला. त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित परमार्थिक सेवेची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

​हा भव्य सोहळा उद्या रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी गोगलगाव (ता. नेवासा) येथे संपन्न होणार आहे. ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व ब्रम्हलीन सद्गुरु दत्तगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘एकदिवसीय फिरता नारळी पुण्यतिथी सोहळा’ या प्रसंगी महंतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !